
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढावा यांचा ९५ वा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला. पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल पंचायतीच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा वाढदिवस साजरा झाला. बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्यभर कष्टकऱ्यांची सेवा केली. त्यांचा १०० वा वाढदिवस पण आपण मोठ्या उत्साहात साजरा करू, या शब्दांत अनोख्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिल्या.
बाबा आढाव यांचा गौरव करताना शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो. बाबा आढाव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी वेचले. या वयात बाबा आढाव सक्रियपणे काम करत आहेत. आजही ते विधायक कामे करत आहेत. अन्याय अत्याचार विरोधात लढत आहेत. सामान्य माणसांचे ओझे हलके करण्याचे काम करत आहेत. आपण सर्वांसाठी ते मोठा आदर्श आहे.
बाबा आढाव यांच्या कार्यकर्तुत्वाचे कौतूक करत शरद पवार म्हणाले, कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता कशी येईल, त्याचा सातत्याने विचार करत बाबा काम करत राहिले. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी काम करत त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी नेहमी सामान्य माणसांचे हितच पाहिले आहे. कष्टकरी, कामगार यांच्यासाठी ते काम करत राहिले आहेत. उपेक्षित समाजातील लोकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात बाबांनी मोठे कार्य केले. आम्ही लोकांनी त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले आहे.
बाबा आढाव यांनी त्यांचे आयुष्य समाजासाठी दिले आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा देतो. तसेच लवकरच त्यांचा शंभरावा वाढदिवस आपण साजरा करु, असे शरद पवार यांनी म्हटले. १९५३ सालापासून बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. या काळात त्यांनी हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, कागद-काच- पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, टेम्पो पंचायतीच्या माध्यमातून कष्टकराऱ्यांसाठी काम केले.