शेजारील व्यक्तीचं पत्नीशी भांडण सुरू होतं, उपअभियंत्याने मध्यस्थी केली अन् पुढे जे घडलं… अलिबागमधील धक्कादायक घटना
Raigad Assistant Engineer Beaten: सरकारी विश्रामगृहातच उपअभियंत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. अलिबागमधील घटनेमागचं धक्कादायक कारण समोर आले आहे.

रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलिबागमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमागे एक वेगळंच कारण समोर आले आहे. यामुळे आता या प्रकरणाची चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहातच एका उपअभियंत्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी वाद घालणाऱ्या व्यक्तीला समज देणं उपअभियंत्याला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही घटना शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. तक्रारदार दिनेश लक्ष्मण पराते, वय ५१ वर्षे, हे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे उपअभियंता असून सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कार्यरत आहेत. ते कामानिमित्त विश्रामगृहात जात असताना प्रवेशद्वारावर अनिकेत कांबळे, वय ४०, राहणार अलिबाग हा आपल्या पत्नीसोबत वाद घालत होता. यावेळी पराते यांनी त्याला “वाद घालू नका, बाहेर जा” असे सांगितले.
याचाच राग मनात धरून कांबळे याने पराते यांची कॉलर पकडून त्यांना तेथील आंब्याच्या झाडावर ढकलून दिले. त्यानंतर तो पत्नीसोबत निघून गेला. परंतु काही वेळातच तो पुन्हा दोन अनोळखी व्यक्तींना सोबत घेऊन आला. दिनेश पराते यांना मारहाण करत शिवीगाळ आणि दमदाटी केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी दिनेश पराते यांच्या तक्रारीवरून अलिबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७६ / २०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
