काँग्रेस स्वयंभू, ते सावरकरांबद्दलच्या भूमिकेवर नक्की विचार करतील… उदय सामंतांचा राज ठाकरेंना थेट सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गटातील संभाव्य युतीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करूनच युतीचा निर्णय घ्यावा, असे सामंत म्हणाले.

काँग्रेस स्वयंभू, ते सावरकरांबद्दलच्या भूमिकेवर नक्की विचार करतील... उदय सामंतांचा राज ठाकरेंना थेट सल्ला
| Updated on: Oct 13, 2025 | 12:08 PM

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच आता लवकरच मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होईल, असे बोललं जात आहे. मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केले. यावेळी उदय सामंत यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असा सल्ला उदय सामंत यांनी दिला.

उदय सामंत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. युती करताना राज ठाकरे हे काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेविषयी नक्की विचार करतील. सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या पक्षासोबत युती करणे हे राज ठाकरेंसारख्या हिंदुत्ववादी नेत्यासाठी उचित ठरणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही

यावेळी उदय सामंत यांनी काँग्रेसशासित कर्नाटक सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे, तिथे या सर्व गोष्टी होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने कर्नाटक सरकारचा हा देखील विचार करायला हवा की सीमाभागातील मराठी लोक आहेत, त्यांना देखील छळण्याचे काम काँग्रेस सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देखील बाजूला करण्याचे काम कर्नाटकचे सरकार करते. त्यामुळे काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही. काँग्रेस कोणालाच मानत नाही, एवढे ते स्वयंभू झालेले आहेत, असा घणाघात उदय सामंत यांनी केला.

ठाकरे गटासोबत युतीचा निर्णय घेणार का?

त्यामुळे अशा पक्षासोबत युती करू पाहणाऱ्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येतात, त्याचा विचार त्यांनी नक्की करावा, असे उदय सामंत म्हणाले. यामुळे आता राज ठाकरे हे ठाकरे गटासोबत युतीचा निर्णय घेणार का, त्यावेळी सोबत काँग्रेस असणार का, याबद्दलचा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडीओ