Ramdas Kadam : एकनाथ शिंदेंसाठी रामदास कदम यांनी संपूर्ण भाजपला अंगावर घेतलं, आता…
Ramdas Kadam : एकनाथ शिंदेंसाठी रामदास कदम यांनी संपूर्ण भाजपला अंगावर घेतलं, परंतु आता शिंदे गटात रामदास कदम एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. ऑडिओ क्लिपनंतर शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी घेऊन मनोज जरांगेंना दिले नसल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि विरोधकांकडून केला जात आहे. मनोज जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट मनोज जरांगे पाटील आणि मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केलं. भाजपमधून एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा कोणी उचलला, असा थेट सवाल रामदास कदम यांनी भाजपला केला. रामदास कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजपच्या प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नवनाथ बन आणि इतर नेत्यांकडून जोरदार पलटवार केला जात आहे. शिंदे गटाकडून रामदास कदम हे एकटेच भाजपला थेट भिडताना दिसत आहेत. तर भाजपमधून चारही बाजूने रामदास कदम यांना टार्गेट केलं जात आहे. यावरून भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम शिवसेनेत एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम शिवसेनेत एकटे पडल्याच्या चर्चेने उधाण आलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या क्लिपवरील टीकेनंतर रामदास कदम भाजपच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून रामदास कदमांवर टीका केली जात आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांच्याशिवाय शिवसेनेतील अन्य नेत्यांकडून भाजपला प्रत्युत्तर दिलेले नाही. रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मित्रपक्षाकडून होत असलेल्या कथित कटाबाबत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत क्लिपच्या चौकशीची मागणी केली. मात्र, रामदास कदमांवरील भाजप आमदारांच्या टीकेला शिवसेनेतील नेत्यांची चुप्पी पाहायला मिळत आहे. भाजपला थेट आव्हान देणारे रामदास कदम पक्षातच एकाकी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस वाढल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एकटे पडलेल्याची चर्चा असलेल्या रामदास कदम यांच्यासाठी शिंदे गट काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
