शरद पवार गटाचा आमदार भाजपच्या व्यासपीठावर; रोहित पवांरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शरद पवार गटाचा आमदार भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचं सांगण्यात येत आहे. यावर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार गटाचा आमदार उपस्थित राहिल्याचा दावा करण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दोन आमदारांचा भाजप उमेदवारांना पाठिंबा असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी काल केला. मंत्री जयकुमार गोरे यांच्या दाव्यावर आता रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित आमदाराबाबत शरद पवार कारवाई करतील, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शरद पवार गटाचा आमदार हा भाजप व्यासपीठावर गेल्याच्या दाव्यावर रोहित पवार म्हणाले, ‘काही लोक व्यासपीठावर दिसतात, पण काही लोक आहेत की नाही ते माहिती नाही.या बाबत शरद पवार त्याबाबत निर्णय घेतील. अनेक आमदार पालकमंत्री 1, 2 कोटी निधी देतोय अशी विकास निधीच्या नावावर भीक मागताना दिसत आहे. मात्र विरोध करायला नेत्यांमध्ये धमक लागते, ती या नेत्यांमध्ये नाही असे दिसते’.
टायगर श्रॉफ गोळीबारावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘बाबा सिद्धिकी, प्रदीप पूर्णेकर यांचीही हत्या झाल्या आहेत. काल टायगर श्रॉफ आणि बारामतीत गोळीबार झाला. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार दुसऱ्याकडे द्यायला हवा. मुळात राज्यात गोळ्या झाडल्या गेल्या नाही पाहिजेत असे काम केले पाहिजे. पोलीस व्हीआयपीना संरक्षण देते, पण सामान्य लोकांना संरक्षण दिले पाहिजे’.
राम पूर्णेकरांच्या विधानावर रोहित पवार काय म्हणाले?
राम पूर्णेकरांनी एकनाथ शिंदे यांनी घरी भेट न दिल्याने नाराजी व्यक्त केली. त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘एकनाथ शिंदे यांनी पूर्णेकर यांच्या घरी जायला काय हरकत आहे.त्या कुटुंबाला भेट दिली, तर त्यांना अभय मिळते. त्यामुळे त्यांनी त्यांची भेट घायला काय हरकत आहे’. तर बार्शीचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही रोहित पवारांनी टीका केली. ‘ सामान्य नागरिक हे प्रामाणिक आहेत, पण तिथले नेते हे फार करामती आहेत. सीईटीचे कनेक्शन हे बार्शीशी आहे, ते आम्ही शोधून काढणार’. जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीवर रोहित पवार म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे मलाही भीती आहे. मी देखील खासगी सिक्युरिटी ठेवली आहे. जितेंद्र आव्हाड यांना देखील अशा पद्धतीने धमकी आली असेल तर गंभीर आहे’.
