रोहित पवारांची पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पुन्हा दांडी; गैरहजेरीमागची कारणं काय? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Rohit Pawar News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला रोहित पवारांनी पुन्हा दांडी मारली आहे. ते केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड दौऱ्यावर गेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला रोहित पवार उपस्थित नव्हते. ते पत्नीसमवेत केदारनाथ बाबांच्या दर्शनासाठी उत्तराखंड दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. याआधीही पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या बैठकांना रोहित पवार अनुपस्थित राहिल्याचं समोर आलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रोहित पवार यांच्या अनुपस्थितीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकांना ते उपस्थित नसल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांमधील त्यांच्या गैरहजेरीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. २० मे २०२६ रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्षाची बैठक पार पडली होती. या बैठकीच्या वेळी रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी पुण्यात असल्याची माहिती देण्यात आली होती.
८ जुलै २०२६ ला विधिमंडळात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक झाली होती. मात्र या बैठकीलाही रोहित पवार अनुपस्थित होते. २९ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला रोहित पवार उपस्थित नव्हते. त्यांच्या गैरहजेरीमागे परदेश दौऱ्याचं कारण सांगण्यात आलं होतं. आज २५ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. मात्र यावेळी रोहित पवार पत्नीसमवेत केदारनाथ दर्शनासाठी उत्तराखंड दौऱ्यावर असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना रोहित पवार वारंवार अनुपस्थित राहत असल्याने त्यांच्या गैरहजेरीची कारणं चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रत्येक वेळी अनुपस्थितीमागे वेगवेगळी कारणं समोर आली असली, तरी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. शरद पवार यांच्या पक्षातील महत्त्वाच्या बैठकांमध्ये रोहित पवारांची उपस्थिती आणि अनुपस्थिती याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.