
कन्नड तालुक्यातील जामडी (फॉरेस्ट) येथे माजी सरपंच रामचंद्र पवार यांच्या मुलाची क्रूर हत्या झाली आहे. मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) दुपारी ही धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. रामचंद्र पवार यांचा मुलगा सकाळीच शेतात गेला होता. त्यानंतर दुपारपर्यंत तो आलाच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर मुलाची हत्या झाल्याचे समोर आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी सरपंच रामचंद्र पवार यांच्या मुलाचे नाव राजू रामचंद्र पवार (वय ४५) असे आहे. ते गेल्या कित्येक वर्षापासून शेती करत आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास राजू नेहमीप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन रिंग होत होता तरीही उत्तर मिळाले नाही. यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले.
क्रूरपणे हत्या
साडेबारा वाजेच्या सुमारास राजू पवार यांचा शोध लागला. शेताजवळील वन विभागाच्या गट क्रमांक ९५ मधील जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडला. अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर तसेच कमरेखालील गुप्तांग भागावर वार केले होते, ज्यामुळे हत्या अत्यंत निर्दयीपणे केल्याचे दिसून येते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील निर्मला पवार यांनी तात्काळ कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याला कळवले. उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, बीट जमादार धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथून श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही बोलावण्यात आले. तरीही रात्री उशिरापर्यंत आरोपीचा ठावठिकाणा लागू शकला नाही.
या प्रकरणाची नोंद कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. मृतदेह तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. बुधवारी शवविच्छेदन होणार आहे. गावात संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.