Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना हीट स्ट्रोकचा फटका? … उपचार सुरू… आज सकाळची हेल्थ अपडेट काय?
Manoj Jarange Patil Health Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तब्येतीविषयी माहिती दिली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रखरखत्या उन्हात अंतरवाली सराटीत आंदोलन केले. त्यामुळे त्यांचे तब्येत खालावली. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. विनोद चावरे हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. आज सकाळी त्यांनी उपचाराबाबत माहिती दिली. त्यांना नेमका कशाचा त्रास झाला याविषयीची माहिती दिली. तर पुढील 48 तास मनोज जरांगे पाटील यांना निगराणी (Manoj Jarange Patil Health Bulletin) खाली ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली
काल अंतरवाली सराटीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई कामी आली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. त्यानंतर जरांगे पाटील यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रखरखत्या उन्हात उपोषण केल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. जरांगे यांना पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली. पुढील 48 तास डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवेल.
हीट स्ट्रोकचा परिणाम?
कालचं तापमान 40-42 डिग्री होते. त्यांना उलट्या, जुलाब याचा त्रास झाला. दिवसभर उन्हात असल्याने हीट स्ट्रोकची, उष्माघाताची शक्यता अधिक असते. तीन चार दिवस त्यांना निगराणी खाली ठेवण्यात येईल. आज सकाळपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी पिलेले नाहीत. सिव्हिएरटी हायड्रेशन आहे. त्यांना फ्ल्युएट सुरू केले आहे.
यापूर्वी सु्द्धा उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपोषणामुळे त्यांची तब्येत सातत्याने खालावत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. सततच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्यात अशक्तपणा आहे. त्यात काल भरउन्हात उपोषण केल्याने त्याचा फटका त्यांना बसल्याचे दिसून आले. यापूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला होता. पण सततचे दौरे, भाषणं आणि आता भरउन्हातील उपोषण याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसून येत आहे.