
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. आज या सुनावणीदरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे केसवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करत आरोपींनी त्यांना बदलण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर कायदेशीर पेच निर्माण झाल्याने न्यायालयाने ही सुनावणी दुपारपर्यंत स्थगित केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडून यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीसाठी धनंजय देशमुख उपस्थित होते. यावेळी आरोपी क्रमांक ३ ते ७ म्हणजेच सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्या वतीने न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला. उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी सक्रियपणे जोडलेले असल्याने ते या प्रकरणात निष्पक्षपातीपणे काम करू शकणार नाहीत, असा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला. यावर उज्जवल निकम यांनी कायद्यात अशाप्रकारे वकील बदलण्याची कुठेही तरतूद नाही असा पलटवार युक्तिवादादरम्यान केला.
यानंतर या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटे याच्या सहभागावरुनही जोरदार युक्तिवाद झाला. विष्णू चाटेचा गुन्ह्यात कुठेही उल्लेख नाही. त्याच्याविरुद्ध पुरावे नाहीत, असा दावा बचाव पक्षाने केला. यावर सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेत सांगितले की, “विष्णू चाटे हा सुरुवातीपासून या गुन्ह्यात सक्रिय होता. वाल्मिक कराडचा निरोप पोहोचवणे आणि हॉटेल तिरंगामधील बैठकीत संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असा आदेश देणे, यात त्याचा मुख्य सहभाग आहे.”
यानंतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक लॅबकडे डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आला आहे. यावेळी आरोपींच्या वकिलांनी आम्हाला व्हिडिओ कॉपी आणि लॅपटॉपमधील पुरावे मिळाल्याशिवाय चार्ज फ्रेम करू नये,” अशी विनंती केली. यावर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना तात्काळ व्हिडिओ कॉपी देण्याचे आणि लॅपटॉपचे रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील हे कळवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील आजच्या सुनावणीला अॅड. उज्वल निकम हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. आता दुपारनंतर न्यायालय उज्वल निकम यांच्या अर्जावर आणि पुढील प्रक्रियेवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.