आईच्या त्यागाने वाचलं मुलाचं आयुष्य; अमरावतीमध्ये जे घडलं..
अमरावती येथे मातेच्या अथांग प्रेमाचे दर्शन घडले. राजश्री अढाऊ यांनी आपल्या मुलाला, कार्तिकला नवजीवन देण्यासाठी स्वतःची किडनी दान केली. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पूर्णपणे मोफत पार पडली. गंभीर मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या मुलाला आईच्या या निःस्वार्थ त्यागामुळे आरोग्य मिळाले, जे विदर्भात अमरावतीला आरोग्य केंद्र बनवत आहे.

आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. त्यांना चांगलं घडवण्यासाठी, मोठं करण्यासाठी, बरं वाईच शिकवण्यासाठी ती मेहनत करते, खस्ता खाते, पण मुलांसाठी ती प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही. आईच्या निर्मळ प्रेमाचं असंच एक सुंदर, हळवं पण तितंकच कणखर उदाहरण नुकताच अमरावतीमध्ये पहायला मिळालं. तिथे एका महिलेन तिच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी दान केली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ७४वे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील आडगाव बु. येथील २० वर्षीय कार्तिक विजय अढाऊ याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक हा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर मूत्रपिंड विकाराने त्रस्त होता. सुरुवातीला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दोन्ही किडन्यांची कार्यक्षमता कमी झाल्याने त्याला नियमित डायलिसिस करावे लागत होते. आठवड्यातून अनेक वेळा डायलिसिससाठी रुग्णालयात जावे लागत असल्याने त्याचे शिक्षण, दैनंदिन जीवन आणि कुटुंबीयांवरही मोठा मानसिक व आर्थिक ताण निर्माण झाला होता.
वैद्यकीय तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी डायलिसिस हा केवळ तात्पुरता उपचार असून दीर्घकालीन दृष्टीने किडनी प्रत्यारोपण हाच प्रभावी पर्याय असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अत्याधुनिक सुविधांसह किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि पूर्णपणे मोफत केल्या जात असल्याची माहिती रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. या रुग्णालयातील यशस्वी उपचारांमुळे विदर्भातील विविध जिल्ह्यांबरोबरच राज्याच्या इतर भागांतून तसेच शेजारील राज्यांमधूनही रुग्ण उपचारासाठी अमरावतीला येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आईनेच मुलाला दिली किडनी
मुलाच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्याची आई राजश्री विजय अढाऊ (वय 46) यांनी कोणतीही तमा न बाळगता स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्या किडनीदानासाठी पात्र ठरल्या आणि त्यानंतर आईकडून मुलाकडे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आईच्या या निःस्वार्थ निर्णयामुळे कार्तिकला नवजीवन मिळाले असून, या मातेच्या त्यागाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून प्रत्यारोपित किडनी व्यवस्थित कार्यरत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. डॉक्टरांच्या मते, नियमित औषधोपचार, तपासण्या आणि आवश्यक वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास रुग्ण पूर्ववत सामान्य जीवन जगू शकतो.
ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नेफरोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख तसेच भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सिंग अधिकारी, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण पथकातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आजपर्यंत ७४ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, शासनाच्या आरोग्य योजनांमधून गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार विनामूल्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय विदर्भातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे.