Rohit Pawar : असेल हिंमत तर..अहवाल सार्वजनिक करण्यावरुन रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

Rohit Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांदीवाल आयोगाच्या अहवालावरुन ओपन चॅलेंज केलं आहे. साडेचार वर्षांपूर्वीच सरकारला हा अहवाल मिळाला. त्यात काय आहे?.

Rohit Pawar : असेल हिंमत तर..अहवाल सार्वजनिक करण्यावरुन रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज
Devendra Fadnavis-Rohit Pawar
| Updated on: Sep 18, 2026 | 11:02 AM

अक्षय मंकणी, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांदीवाल आयोगाच्या अहवालावरुन ओपन चॅलेंज केलं आहे. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री बनले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. मविआ सरकार असताना परमवीर सिंग यांच्या ऐकीव माहितीच्या आधारे फडणवीसांनी हे आरोप केले असा रोहित पवार यांचा दावा आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्या. चांदीवाल आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. न्या.चांदीवाल आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून साडेचार वर्षांपूर्वीच सरकारला अहवालही सादर केला. पण अजून हा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यावरुन रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

दोन वर्षांपूर्वी अनिल देशमुख यांनी स्वत: चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मनसुख हिरेन खून प्रकरण, 100 कोटी गोळा करण्याचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले होते. त्यामुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.”चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर का आणला जात नाही?” असा प्रश्न दोन वर्षांपूर्वी सुद्धा देशमुख यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी अनिल देशमुख यांनी अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटक ठेवण्याबाबत सर्वात खळबळजनक आरोप केला होता. माजी आयपीएस अधिकारी परामबीर सिंग हे त्या प्रकरणाचे मास्टर माईंड होते. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असा अनिल देशमुख यांनी आरोप केला होता .

होऊ द्या दूध का दूध अन् पाणी का पाणी

दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणात आता एक्सवर पोस्ट केली आहे. “मविआ सरकार असताना परमवीर सिंग यांच्या ऐकीव माहितीच्या आधारे तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आकाश-पाताळ एक करत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर खोट्या आरोपांची राळ उठवली. न्या. चांदीवाल आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून साडेचार वर्षांपूर्वीच सरकारला अहवालही सादर केला. हा अहवाल सार्वजनिक करावा म्हणून स्वतः देशमुख साहेबांनी १३ वेळा सरकारकडे पत्रव्यवहार केला, पण हा अहवाल सार्वजनिक करण्याची मुख्यमंत्र्यांची हिंमत होत नाही… आपल्या खोटेपणाचा पर्दाफाश होईल म्हणून मुख्यमंत्री साहेब घाबरतात का? असेल हिंमत तर अहवाल सार्वजनिक करून होऊ द्या दूध का दूध अन् पाणी का पाणी…” मुख्यमंत्री साहेब, चांदीवाल आयोगाचा अहवाल जाहीर करा, अन्यथा देशमुख साहेबांची जाहीर माफी मागा असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us