एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार, पुणे शिक्षक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आता निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार, पुणे शिक्षक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 6:33 PM

मोठी बातमी समोर येत आहे, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाच्या आहेत, दोन्ही जागांवर आमचा दावा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे देखील पुणे शिक्षक मतदार संघामधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. दरम्यान शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. तर पदवीधर मतदार संघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीवरून  महायुतीमधील घटक पक्ष आता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर बोलताना आता राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मोठं विधान केलं  मंगेश चिवटे यांना महायुतीची उमेदवारी न मिळाल्यास आम्ही त्यांना  राजर्षी शाहू विकास आघाडीकडून उमेदवारी देऊ अशी घोषणा यड्रावकर यांनी केली आहे. आम्ही चिवटे यांना पूर्ण ताकदीने निवडून आणू, असंही यावेळी यड्रावकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत,  उमेदवारी न मिळाल्यास पर्यायी व्यवस्था उभी करून चिवटेंना निवडून आणू, असं यावेळी धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच वाढण्याची शक्यात आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले? 

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाच्या आहेत, असं पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आम्ही या जागा महायुतीमध्ये लढणार आहोत, मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us