पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करा, राहुल शेवाळेंची अर्थमंत्र्यांकडे मागणी

पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा, अशी मागणी दक्षिण- मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांचा जीएसटी माफ करा, राहुल शेवाळेंची अर्थमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : कोल्हापूर, संगलीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे(Kolhapur-sangli flood) स्थानिक व्यापाऱ्यांचेही अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा, अशी मागणी दक्षिण- मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यातील पूरग्रस्त बांधवांचे कोसळलेले संसार उभारण्यासाठी सर्वच स्तरातून मदत दिली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या माध्यामातू मुंबईत सेनाभवन येथे मदत कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच हजारो शिवसैनिक प्रत्यक्ष पुराच्या ठिकाणी जाऊन मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याना पत्र लिहून पूरग्रस्त व्यापाऱ्यांची मदत करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नाशिक, वसई, विरार आणि पालघर याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे हजारो घरे, दुकाने, कार्यालये, गोदामे आणि कारखाने यांचे अतोनात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या हजारो दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. या दुकानदार आणि व्यापाऱ्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे. असे राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटलं आहे.

“पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अतोनात मेहनत करत आहे. त्याचबरोबर, या पुरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना जीएसटी माफ करावा”, अशी लेखी मागणी राहुल शेवाळे यांनी केंद्रीय अर्थमंत्र्याना केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकार पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करत आहे. याशिवाय सामाजिक संस्था, शिवसेना मदत निधी, खासगी अनुदान अशा विविध माध्यमातून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याचवेळी पूरग्रस्त व्यापाऱ्यांनाही सरकारी मदतीची गरज आहे. त्यांना जीएसटी माफ केल्यास मोठा दिलासा मिळू शकेल असेही ते म्हणाले.

या मागणीसह राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदार निधीतून पूरग्रस्तांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात हजारो बिस्कीटचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्याही राहुल शेवाळे यांनी ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या माध्यमातून पूरग्रस्त भागात देण्यात आल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *