दहावीत 94 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दुष्काळ, आर्थिक परिस्थितीशी झुंज देऊन 94 टक्के गुण मिळवलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अक्षय शहाजी देवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

, दहावीत 94 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

उस्मानाबाद : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिशन अकरावी अडमिशनला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र दुष्काळ, आर्थिक परिस्थितीशी झुंज देऊन 94 टक्के गुण मिळवलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. अक्षय शहाजी देवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अकरावीसाठी आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न भेटल्याने त्याने आत्महत्या केली आहे. उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील देवळाली या गावात ही घटना घडली आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

देवळाली गावात राहणाऱ्या अक्षयने दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीवर मात करत दहावीत घवघवीत यश मिळवलं होतं. त्याला दहावीत 94 टक्के गुण मिळाले होते. तसेच अक्षयने गणित विषयात 99 गुण मिळवले होते. या गुणांच्या आधारे त्याला चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन डॉक्टर व्हायचे होते. मात्र आधीच गावात दुष्काळ पडल्याने घरातील आर्थिक स्थिती कमकुवत झाली होती. मात्र त्या परिस्थितीतही त्याने अकरावीला प्रवेश घ्यायचा निश्चय केला. पण अकरावीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने आज (21 जून) आत्महत्या केल्याची चर्चा गावात रंगली आहे. मात्र अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नसल्याने त्याने नक्की आत्महत्या का केली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल 8 जूनला जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 77.10 टक्के लागला असून निकालात तब्बल 12.31 टक्क्यांनी घट झाली. यानंतर मिशन अकरावी अडमिशनला सुरुवात झाली आहे. यानुसार येत्या 6 जुलैला अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *