उस दरवाढीच्या आंदोलनाचा वणवा भडकला, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, उसाचा टॅक्टर पेटवला
Sugarcane Price Protest: ऊस दर आंदोलन चिघळल्याचे दिसून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सातारा आणि सांगली जिल्ह्यांत ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला आक्रमक वळण मिळालं आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तर सांगली जिल्ह्यात ताकारीजवळ ऊस वाहतूक रोखून उसाने भरलेली ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांमुळे ऊस दर आंदोलन तापल्याचं चित्र आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांना ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी केली आहे. मात्र वारंवार विनंती करूनही कारखाने सुरू होत असल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नाईलाजाने ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून आंदोलन तीव्र करावं लागत असल्याची भूमिका संघटनेकडून मांडण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात ताकारीनजीक गुहागर-तासगाव मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती.
कराड येथील यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्यासाठी ही ऊस वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. यावेळी उसाने भरलेली ट्रॉली पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकांतील हवा सोडून वाहतूक रोखण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराबाबत स्पष्ट भूमिका सांगावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. साखरेला किमान विक्री मूल्य (एमएसपी) आणि उसाची पहिली उचल जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना लागणारा खर्च, वाढते उत्पादन खर्च आणि उसाला मिळणारा दर यावरून दरवर्षी संघर्ष निर्माण होतो. यंदाही दर जाहीर करण्याच्या मागणीवरून आंदोलन तीव्र होत असल्याचं दिसत आहे. ऊस वाहतुकीची वाहनं पेटवण्याच्या प्रयत्नांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या आंदोलनावर साखर कारखानदार आणि प्रशासन काय भूमिका घेतं, तसेच ऊस दराबाबत तोडगा निघतो का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
