Tiger Shroff : ….त्यांना सोडणार नाही, टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार, एकनाथ शिंदे संतापले, पहिली प्रतिक्रिय समोर
अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी वाहनावर गोळीबार केला. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर मुंबईच्या जुहू परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. फूटबॉलची मॅच खेळून घराकडे परतत असताना त्याच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन जणांनी चार ते पाच राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमधून टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आहे. मात्र त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेवरून आता राजकीय वर्तुळात देखील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
‘ही घटना धक्कादायक आहे, निंदाजनक आहे. या घटनेमधून एक प्रकारची दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे. टायगर श्रॉफ एक उभरता अभिनेता आहे. त्याला धमकी देऊन, त्याच्या गाडीवर फायरिंग करून एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी या घटनेसंदर्भात मुंबई पोलिसांशी देखील बोललो. या घटनेसंदर्भात मुंबई आयुक्तांनी टीम तयार करून तपासाला सुरुवात केली आहे. हल्लेखोरांना जशास तसं त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, कोणाचीही दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही, मुंबईत कलाकारांना घाबरण्याची गरज नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.’
काँग्रेसचा हल्लाबोल?
दरम्यान या घटनेवरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी चिंता व्यक्त केली असून, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नेते आणि अभिनेते सुरक्षित राहू शकत नाहीत, तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील? या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे ही आमची मागणी पूर्वीपासून आहे. आणि पोलिसांना फ्रीडम देऊन काम करण्याची संधी द्यावी आणि त्यांचा धाक पुन्हा हा गुन्हेगारांवर बसण्यासाठी काम व्हावं,’ असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदिप पुर्णेकर यांचा ठाण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ हे सुखरुप आहेत. पण राज्यात नेते आणि अभिनेतेच जर सुरक्षित नसतील सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न यामुळं निर्माण होतो. कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था? असं म्हणण्याची वेळ आता आलीये. राज्याच्या आर्थिक राजधानीत गुंडांचा भररस्त्यात असा हैदोस सुरु असेल तर कोणता उद्योजक राज्यात गुंवतवूक करणार? सरकारने आधी राज्य नीट चालवावं आणि जमत नसेल तर एखाद्या सक्षम मंत्र्याकडं गृहखातं सोपवावं.’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
