तुकाराम मुंढेंना सलाम! आपल्याच अधिकाऱ्यांचं केलं निलंबन; सुपारीचा घोळ समोर येताच निर्णय
एफडीए विभागाकडून अन्नपदार्थातील भेसळ कमी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी याच विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला जातोय. अशाच एका प्रकरणात चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीनंतर तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे सध्या एफडीएचे आयुक्त आहे. त्यांनी हा पदभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत एफडीएने अनेक ठिकाणी कारवाया केल्या आहेत. काही आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. तर काही ठिकाणी धाडी टाकून निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या येण्याने अन्नपदार्थांतील भेसळ खूप कमी झाल्याची भावना सामान्यांकडून व्यक्त केली जातेय. दरम्यान, एकीकडे मुंढे यांच्या एफडीए विभागाकडून अन्नपदार्थातील भेसळ कमी करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी याच विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला जातोय. अशाच एका प्रकरणात चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीनंतर तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भिवंडी आणि नाशिकमध्ये एफडीएने असुरक्षित सुपारी पकडली होती. ही सुपारी नियमानुसार नष्ट करण्यात आलेली नाही, असा आरोप केला जात होता. याच प्रकरणात मुंढे यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत विचारले असता खुद्द मुंढे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. “एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुपारी पकडली होती. ती सुपारी असुरक्षित होती. अशा प्रकारे असुरक्षित सुपारी आली की ती नष्ट करावी लागते. नष्ट करण्याची एक पद्धत ठरलेली आहे. परंतु ही सुपारी पूर्णपणे नष्ट न केल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. जेवढी सुपारी पकडली होती, तेवढीच सुपारी नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आली. परंतु प्रत्यक्षपणे तेवढी सुपारी नष्ट केलेलीच नाही, हे चौकशीतून समोर आले,” असे मुंढे यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, सुपारी कुठे गेली?
तसेच, चौकशीनंतर बाकीची सुपारी गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळेच आता संंबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे, असेही पुढे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुंढे यांनी आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच असुरक्षित असणारी तसेच नष्ट न केलेली सुपारी नेमकी गेली तरी कुठे? असा सवालही उपस्थित झाला आहे.
