Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

Uddhav Thackeray : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातील विरोधी पक्षांसाठी एक अनुकूल वातावरण तयार झालं आहे. विरोधी पक्षांकडून भाजपची कोंडी करण्याचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 22, 2026 | 3:46 PM

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनामुळे सध्या देशात वातावरण चांगलचं तापलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. CJP ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीकमुळे विद्यार्थी, पालकवर्ग चांगलाच संतप्त झाला. कारण विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतात. दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातील विरोधी पक्षांसाठी एक अनुकूल वातावरण तयार झालं आहे. विरोधी पक्षांकडून भाजपची कोंडी करण्याचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानात आंदोलन केलं होतं. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला.

म्हणून आता दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी विरोधात उद्धव ठाकरे यांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. 24 जुलैला शिवाजी पार्क मैदानात ही रॅली आयोजित केली आहे.

उद्धव ठाकरेंनी या रॅलीत सर्वपक्षीयांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दीपकेंची भेट घेतली. याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दीपके यांना पाठिंबा जाहीर केला होता.

फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही

उद्धव ठाकरे काल आंदोलन स्थळावर आले, तेव्हा दीपके उद्धव ठाकरे यांचा हात धरुन त्यांना स्टेजवर घेऊन गेले. उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे बिनीचे शिलेदार होते. उद्धव ठाकरे यांनी मंचावरुन हात उंचावत जंतरमंतरवरील तरुणांना अभिवादन केले.”फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ताबदल केल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही. तुम्ही बिनधास्त आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आज सारी दिवारे तुट चुकी आहे. तुमच्या आमच्यातील जातीधर्माच्या सर्व भिंती उभ्या केल्या होत्या त्या आता तुटल्या आहे. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे” असं ते म्हणाले.

 

 

 

Follow Us