लक्षात ठेवा, तुमची कार्यालये मुंबईत आहेत, विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला.

लक्षात ठेवा, तुमची कार्यालये मुंबईत आहेत, विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकरी सन्मान दौऱ्यानिमित्त औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. “शेतकरी जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शिवसेना करते. निवडणुका झाल्यानंतर मी शांतपणे बसू शकत होतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पहिल्या मदत केंद्राची भेट घ्यायला मी इथे आलो आहे. गंगापूरकरांविषयी मला राग नाही. पण गंगापूरकरांचे शिवसेनेवरचे प्रेम आटले आहे का असे वाटायला लागले आहे. माझ्या हक्काच्या गंगापूर मतदारसंघातून शिवसेनेचा भगवा मागे कसा काय पडला. असा सवाल विचारत त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचा जाब विचारला.

प्रधानमंत्री विमा योजनेत घोटाळा झाला असल्याची शक्यता आम्हाला होती. मागे मी बीडला असताना एक शेतकरी माझ्या मंचावर आला, त्याला कर्जमाफी प्रमाणपत्र दिले होते. पण त्याचं कर्जमाफ झालं नव्हतं. आम्हाला कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी आहे. पण ही मागणी करताना राज्याची आर्थिक परिस्थिती बघावी लागते. दीड लाखांपर्यंत कर्जमाफी झाली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आम्ही कामे करत नसू तर आम्ही सुद्धा काँग्रेसच्या अवलादीचे समजावे लागेल. आमच्या मंचावर शिवरायांचा पुतळा डेकोरेशनसाठी नाही ठेवला त्यांच्या विचाराने काम करतो. मी जनावरांच्या छावणीला भेट दिली. जनावरांना माय म्हणायची संस्कृती दुसऱ्या कुठल्या देशात नाही. छावण्यात गुरांसह माणसं सुद्धा राहतात आम्ही त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली.  काल शेतकरी भेटला त्याला फुल नाही फुलांची पाकळी भेट दिली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

विरोधक म्हणाले बैल गेला आणि झोपा केला अशी टीका केली. पण आम्ही मदत करून पंधरा दिवस उलटून गेले पण अजून पाऊस नाही, असं ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी मला अर्ज दिलेत ते अर्ज घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गरज पडल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. शिवसेना सत्तेत आहे ते सर्वसामान्यांचा आवाज म्हणून सत्तेत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

विमा योजनेत जो घोळ झालाय तो आता हळूहळू समोर येत आहे. विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला.

दुष्काळ अजूनही जायचं नाव घेत नाही. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका लढण्याची धमक ठेवा शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला न्याय कोण देत नाही तेच मी पाहतो. अडल्या नाडल्या शेतकऱ्यांनी आमच्या पीकविमा मदत केंद्रावर यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *