उल्हासनगर गोळीबाराने हादरलं! स्टेशन परिसरात दोन राउंड फायरिंग, एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Ulhasnagar Firing Incident News: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. अशातच आता जिल्ह्यातील उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात अंधाधूंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी दोन राउंड फायर केल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत्यू व्यक्तीचे नाव हरीश गझवानी असं असल्याचे समोर आले आहे. हरीश गजवानी कॅम्प क्रमांक चार परिसरात होते. त्यावेळी तिथे हल्लेखोरआले. त्यानंतर हल्लेखोराने पिस्तूल काढली आणि गजवानी यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.
गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील हरीश गजवानी जागेवरच कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. या गर्दीचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी पळ काढला आहे. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृताच्या कुटुंबियांसोबत संपर्क करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या घटनेचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
ही घटना पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेतील हल्लेखोर फरार झाला आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांचा तपास लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्टेशन परिसरात बंदूकधारी व्यक्ती येत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
