Sanjay Raut : त्यांना काय फडणवीसांनी अभय दिलं का ? संजय राऊत भडकले, नेमकं काय घडलं ?

महाड निवडणुकीतील राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तरी त्याला अद्याप अटक नाही. यावरून संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मंत्र्यांच्या मुलांवर कारवाई का नाही, त्यांना अभय दिले का, यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत राऊतांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sanjay Raut : त्यांना काय फडणवीसांनी अभय दिलं का ? संजय राऊत भडकले, नेमकं काय घडलं ?
Sanjay Raut
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 26, 2025 | 10:47 AM

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असताना राडा झाला आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. हे प्रकरण चंगलंच तापलं आहे. विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजप सरकार यांच्यावर टीकेची तोफ डागली डागली आहे. कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल विचारत राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

राऊतांची थेट टीका

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. भाजपसोबत असलेल्या आघाडीतील लोकं हे भाजपचा पराभव करण्यास इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. भाजपसोबत सत्तेत असलेले पक्ष हे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं. ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजप चालवतंय ते पाहिलं आहे का, गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधले एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे, त्यावर कोणी प्रश्न का उपस्थित करत नाही असं राऊत म्हणाले.

त्यांना काय अभय दिलं का ?

महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत एका काँग्रेसच्या कार्यकर्त्या ला ठार मारण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्यावर हल्ला केला (attempt to Murder) आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली. हायकोर्टाने गागोवले यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन सुद्धा फेटाळला, म्हणजे हे प्रकरण गंभीर आहे ना. मंत्री, मंत्र्यांची मुलं, त्यांचे भाऊ यांनी खून केले, दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री फडणवीस आणि राज्याच्या महासंचालकांनी अभय दिलं आहे का ? तो (गोगावले) फरार आहे, आणि पोलिसांना सापडत नाही, त्याचा अटकपूर्वी जामीन फेटाळला जातो,तरीही तो सापडत नाही.

राज्याचा एक मंत्री (कोकाटे) बेपत्ता होतो आणि 48 तास सापडत नाही. पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.  कुठे गेला मंत्र्यांचा (गोगावले) मुलगा ? कोणालाही सोडणार नाही असं म्हणतं तुम्ही विधानसभेत भाषणं देता ना, मग मंत्र्यांची मुलं, त्याचे भाऊ, बाप, कसे सुटतात असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला.