Wardha Sevagram | वर्ध्यातील सेवाग्राम विकास आराखडा, 81 कोटींचा अतिरिक्त निधी, 244 कोटींचा सुधारित आराखडा

मंजूर करण्यात आलेल्या 81 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमध्ये या नवीन उपक्रमासाठी 39 कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये विविध नावीन्यपूर्ण कामांचा समावेश आहे.

Wardha Sevagram | वर्ध्यातील सेवाग्राम विकास आराखडा, 81 कोटींचा अतिरिक्त निधी, 244 कोटींचा सुधारित आराखडा
बैठकीत उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर.
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 7:06 PM

वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी 81 कोटी 57 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. हा आराखडा आता एकूण 244.087 कोटी रुपयांचा झाला. या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत (Summit Committee Meeting) मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत. तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घेण्यात यावी. अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती हा नवीन उपक्रम राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, वर्धा पालकमंत्री सुनील केदार (Guardian Minister Sunil Kedar), वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार रणजित कांबळे, खासदार रामदास तडस, पंकज भोयर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मल्टी मिडिया तंत्रज्ञानाचा वापर

मंजूर करण्यात आलेल्या 81 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमध्ये या नवीन उपक्रमासाठी 39 कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये विविध नावीन्यपूर्ण कामांचा समावेश आहे. ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरअॅक्टीव्ह प्रदर्शन, मल्टी मिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या आसपास दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपचे निर्माण केले जाणार आहे.

हेरीटेज पोस्ट ऑफिसचा वारसा

सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरीटेज पोस्ट ऑफिसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या सूत्रानुसार देय ठरणाऱ्या नियतव्ययाच्या व्यतिरिक्त आणखी रुपये 10 कोटी इतका अतिरिक्त निधी दरवर्षी जिल्हा नियोजन समिती, वर्धा यांना सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या संवर्धनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.