Weather Update : वारं फिरलं, कमी दाबाचा पट्टा; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, पुढचे 5 दिवस धोक्याचे
मोठी बातमी समोर येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यता आला आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

यंदा भारतावर एल निनोचा मोठा प्रभाव पहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, पुढील 24 तासांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. याचा परिणाम म्हणून हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरीमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून, वाऱ्याचा वेग देखील ताशी 60 किमी पर्यंत राहू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे, या राज्यांमध्ये पुढील पाच दिवस अशीच स्थिती राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
दुसरीकडे मात्र उत्तर भारतात या काळात हवामान कोरडं राहणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडं राहणार असून, पावसाची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे जम्मू -काश्मीर आणि लडाखमध्ये येत्या 22 ते 25 ऑक्टोरपर्यंत आणि उत्तराखंडमध्ये 23 ते 25 ऑक्टोबरपर्यंत काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील सातारा, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये मात्र मंगळवारी कोरडं वातावरण राहणार आहे. दुसरीकडे सोमवारी पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पुण्यात पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.