Train First AC Honeymoon : ट्रेनच्या फर्स्ट एसीला हनीमून सूट बनवणारं ते जोडपं कोण? महाराष्ट्रातील घटना
Train First AC Honeymoon : सुरुवातीला लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ रोमँटिक सरप्राइज सांगून शेअर केला. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा व्हिडिओ पहायला मिळाल्याची चर्चा आहे. काही तासात हा व्हिडिओ रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर सगळं चित्रच बदललं.

सध्या सोशल मीडियावर ट्रेनच्या फर्स्ट एसी मधील हनीमूनची चर्चा रंगली आहे. ट्रेनच्या फर्स्ट एसीला फुलांनी सजवण्यात आलेलं. त्यावर सफेद चादर, गुलाबाच्या पाकळ्या, लाल-सफेद फुगे आणि I Love You चा मोठा मेसेज लिहिलेला. ट्रेनच्या फर्स्ट एसी डब्ब्यात कोणीतरी मधुचंद्र साजरा करण्याचा प्लान केलेला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. पण या सगळ्यामागे कोण, त्या बद्दल अजूनही रहस्य आहे. ते कपल कोण आहे? ज्यांनी लक्षात राहिल अशा हनीमूनसाठी ट्रेनच्या फर्स्ट एसीलाच हनीमून सूट सारखं सजवलं. रेल्वेने अजूनपर्यंत त्यांची ओळख सार्वजनिक केलेली नाही. य प्रकरणात एका रेल्वे कर्मचाऱ्याचं निलंबन झालं आहे. सजावट करणाऱ्या डेकोरेटर विरुद्ध रेल्वे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पहिल्या नजरेत हा व्हिडिओ कुठल्यातरी फिल्मी सीन सारखा वाटतो. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एखादा हनीमून सूट सजवतात तसं वाटतं. पण हे हॉटेल नाही, नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (ट्रेन संख्या 11002) फर्स्ट एसी आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत स्टेटमेंटनुसार 6 जुलै 2026 रोजी नांदीग्राम एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने ऑनलाइन डेकोरेटर बुक केला. ट्रेनच्या फर्स्ट एसीला खास पद्धतीने सजवून प्रवास स्मरणीय करायचा होता. ट्रेन महाराष्ट्रात जालन्याला पोहोचली. तेव्हा डेकोरेटर परवानगी न घेता डब्ब्यात दाखल झाला. काही मिनिटात त्याने फर्स्ट एसीचा लूक बदलून टाकला. बर्थवर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या. चारही बाजूंना फुलांची झालर लावली. लाल आणि सफेद फुग्ग्यांनी परिसर भरुन टाकला. रंगीत लाइट लावली. मोठ्या अक्षरात I Love You लिहिलं. सजावट पूर्ण झाल्यावर त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला.
हे दाम्पत्य कोण?
या सगळ्या प्रकरणात चर्चा त्या जोडप्याची आहे, ज्यांच्यासाठी ही सजावट केलेली. रेल्वेने आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यांची ओळख सार्वजनिक केलेली नाही. ते कुठल्या शहरातील आहेत तसच त्यांनी कुठल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन ही बुकिंग केलेली हे सुद्धा जाहीर केलेलं नाही. त्या दाम्पत्याची ओळख नाही, तर सुरक्षा नियमांचं उल्लंघन हे रेल्वे तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणात कारवाईची पहिली कुऱ्हाड ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यावर कोसळली.