मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या (Gas Leakage in Mumbai) तक्रारी आल्याने एकच खळबळ उडाली.

मुंबईत अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अनेक ठिकाणी गॅस गळतीच्या (Gas Leakage in Mumbai) तक्रारी आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर मुंबई महानगर पालिकेने (BMC) यासंबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा (High Alert) दिला आहे. ज्या भागातून गॅस गळती झाल्याच्या तक्रारी आल्या त्या भागात तात्काळ 9 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.

मुंबईतील राष्ट्रीय रासायनिक खतांच्या चेंबूर यंत्रणेतून गॅस गळती होत असल्याची तक्रार आली होती. स्थानिक रहिवाशांना या भागात मोठ्या प्रमाणात गॅसचा वास येत असल्याने ही तक्रार केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काही वेळातच एकच गोंधळ उडाला. मात्र, काहीवेळेतच महानगर गॅस लिमिटेडने (MGL) यावर स्पष्टीकरण दिले. आतापर्यंतच्या तपासात कोणत्याही पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्याचं स्पष्ट झालेलं नसल्याचं एमजीएलने सांगितलं.

अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात

बीएमसीने सरक्षेची काळजी म्हणून अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्ळावर तैनात केल्या आहेत. गॅसचा वास आल्याने गळती झाल्याच्या तक्रारी चेंबूर, मानखुर्द आणि गोवंडी भागातून आल्या आहेत. मात्र, अद्याप ही गळती कोठून झाली याची माहिती मिळू शकलेली नाही.

महानगर गॅस लिमिटेडने अद्याप गॅस गळतीला दुजोरा दिलेला नाही. एमजीएलने म्हटले, “आतापर्यंत गॅस पाईप फुटल्याच्या अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. गॅस पाईपलाइन फुटल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. आपातकालीन पथकाला तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.”

गॅस गळतीसंबंधित 82 फोन कॉल

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला गुरुवारी (19 सप्टेंबर) रात्री 8:39 पासून 11:43 पर्यंत गॅस गळतीसंबंधित 82 फोन कॉल आले. या तक्रारींनंतर महानगर गॅस लिमिटेड, आरसीएफ आणि बीपीसीएलने संयुक्तपणे मोहिम राबवली. मागली काही तासात मात्र गॅस गळतीची कोणतीही तक्रार नाही.

आरसीएफचं स्पष्टीकरण

आरसीएफने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “पवई, चेंबूर, चकाला आणि गोरेगाव ते मीरा रोडपर्यंत गॅस गळतीबाबत जोरदार अफवा पसरली आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेडच्या (आरसीएफ) ट्रॉम्बे युनिटमध्ये गॅस गळती झाल्याचा काही लोकांचा आरोप आहे. मात्र, कोणत्याही आरसीएफ प्लांटमध्ये गॅस गळती झालेली नाही. मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी आरसीएफ ट्रॉम्बे युनिटला भेट दिली. तेथे कोणतीही गॅस गळती सापडली नाही. तेथे सर्व काही सामान्य आहे. आरसीएफमधील सर्व प्लांट ऑपरेटिंग प्रक्रियेनुसार सामान्य चालू आहेत.”

आरसीएफ ही एक आयएसओ 14001 प्रमाणित कंपनी आहे. पर्यावरण स्वच्छ आणि हरित राखण्यासाठी आरसीएफ सर्व प्रयत्न करते. विविध नामांकित संस्थांकडून याबद्दल नेहमीच आरसीएफची प्रशंसा करण्यात येते, असंही आरसीएफने आपल्या निवदनात म्हटलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *