‘हिंमत असेल तर राज ठाकरेंच्‍या घरी छापा मारुन दाखवा’

‘हिंमत असेल तर राज ठाकरेंच्‍या घरी छापा मारुन दाखवा’

रायगड : “सरकारमध्‍ये हिंमत असेल, तर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्‍या घरी छापा मारुन दाखवावा”, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिले. ते रायगडमधील महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना आदर्श आचारसंहिता मानत नसल्याचाही आरोप केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकण्याचे सत्र सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर, मलिक यांनी सरकारला हे आव्हान दिले. नवाब मलिक म्हणाले, ‘मागील निवडणुकीमध्ये राज ठाकरे मोदी सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. आता ते मोदींविरोधात प्रचार करत आहेत, तर सरकारकडून त्यांच्या सभेचा खर्च विचारला जात आहे. सरकारच्या वेगवेगळ्या यत्रंणानी विरोधकांवर छापे मारण्याचे सत्र सुरु केले आहे. मात्र, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राज ठाकरेंच्या घरावर छापा मारुन दाखवावा.’

भाजप शिवसेना आदर्श आचारसंहिता मानत नाहीत. तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करणे त्यांची जबाबदारी होती. मात्र, तसे झाले नाही, असाही आरोप मलिक यांनी यावेळी केला.

दरम्यान, रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे तर शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रचारासाठी रायगडमध्ये ठाण मांडून आहेत. तर शिवसेना नेतेही गितेंच्या प्रचारार्थ तळ ठोकून आहेत. रायगडमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होत आहे. या टप्प्यात रायगडसह राज्यातील एकूण 14 जागांसाठी मतदार होईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *