राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, काँग्रेसचे दिलीप माने शिवसेनेत, उद्धव ठाकरे म्हणतात...

सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्यकर्ते नागनाथ क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल या तिघांनी आज मातोश्रीवर जात शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे दिलीप सोपल, काँग्रेसचे दिलीप माने शिवसेनेत, उद्धव ठाकरे म्हणतात...

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. सोलापुरातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) आणि काँग्रेस कार्यकर्ते नागनाथ क्षीरसागर या तिघांनी आज मातोश्रीवर जात शिवसेनेत प्रवेश घेतला. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिघांचाही प्रवेश झाला. उद्धव ठाकरेंनी या तिघांनाही शिवबंधन बांधले. यावेळी “उद्धव ठाकरे सांगतील तिथून मी निवडणूक लढेन” असे यावेळी दिलीप मानेंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे सोलापूरमध्ये ज्या ठिकाणाहून सांगितलं, तिथून मी निवडणूक लढायला तयार आहे. मी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतो ती भाजपची जागा आहे. उद्धव ठाकरेंनी पक्षाचे काम करायला सांगितलं तर तेही करण्याची माझी तयारी आहे, असे दिलीप मानेंनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबाबत अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यंदा होणारी निवडणूक शिवसेना ही युतीतच लढणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी युती जाहीर करताना गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे यापूर्वी विधानसभेचेही ठरले होते. स्वतः मुख्यमंत्र्यानी ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत युतीबाबत जाहीर केले आहे. त्यामुळे युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही. आमच्या सर्वांच्या साक्षीनं पुढची युती होईल असे याआधी स्पष्ट केलं आहे.”

“त्यामुळे आमचं ठरलेलं आहे, त्यामुळे या चर्चेला काहीही अर्थ नाही. तसेच बाकीच्या चर्चेला अर्थ नाही, जे तुमच्या माध्यमातून सांगणार,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

विविध विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आता ज्या कुणाला पक्षात घेत आहे, त्यांना कुठेही अंधारात ठेऊन किंवा माहिती न देता पक्षात घेत नाही. दरम्यान जे कोणीही पक्षात येतात ते सर्व पदासाठी येतात असे नाही.”

“सध्या परिस्थिती चांगलीच आहे, चांगले सहकारी येतात, त्यामुळे युती होणार असे उत्तर मी आधीही दिले आहे आणि त्यामुळे युतीबाबतच माझे उत्तर तेच आहे. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *