दंतेवाडात 37 नक्षलींचे आत्मसमर्पण, 12 महिला कमांडरचाही सहभाग, 65 लाखांचे होते बक्षिस

छत्तीसगडच्या दंतेवाडात ३७ माओवाद्यांनी पोलिसांसमोर शस्रे टाकली आहेत. त्यात १२ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील २७ नक्षलींवर एकूण ६५ लाखांचे इनाम घोषीत केले आहे.

दंतेवाडात 37 नक्षलींचे आत्मसमर्पण, 12 महिला कमांडरचाही सहभाग,  65 लाखांचे होते बक्षिस
37 Naxalites surrender
| Updated on: Nov 30, 2025 | 8:30 PM

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या माओवादी नेत्यासोबत ३७ सक्रीय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरेंडर करणाऱ्यात २७ बक्षिस जाहीर झालेले माओवादी देखील सामील आहेत. यांच्यावर एकूण ६५ लाख रुपयांचे इनाम घोषीत होते. जिल्ह्यात सुरु असलेली पुनर्वसन योजना ‘पूना मारगेम’ मुळे या सर्वांनी शरणागती पत्करली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये १२ महिलांचाही समावेश आहे.

या सर्व मावोवाद्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा संकल्प करीत पोलीस आणि प्रशासनासमोर शस्रास्रे खाली टाकल्याचे दंतेवाडा पोलिसांनी सांगितले.

या यशस्वी आत्मसमर्पन मोहिमेत डीआरजी, बस्तर फायटर्स, विशेष गुप्तचर शाखा, १११ वी आणि २३० वी सीआरपीएफ बटालियन आणि आरएफटी जगदलपूरच्या पथकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे पोलीस अधिक्षक गौरव राय यांनी सांगितले.या एजन्सींनी महिन्यांहून अधिक काळ सातत्यपूर्ण दबाव, पाळत ठेवणे आणि विश्वासार्ह गुप्तचर माहिती आधारे या मावोवाद्यांना सरेंडरसाठी तयार केले.

पुनर्वसन धोरणांतर्गत, सर्व आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना ५०,००० रुपयांची तात्काळ मदत दिली जाणार आहे. याशिवाय छत्तीगड सरकारच्या वतीने कौशल विकास प्रशिक्षण, कृषी भूमी आणि सामाजिक पुनर्वसन सारख्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. या मोहिमेमुळे त्यांना नवीन जीवनाची संधी दिली जात आहे.

२० महिन्यात दंतेवाडात १६५ नक्षली सरेंडर

केंद्र आणि राज्य सरकारच्या नक्षल पुनर्वसन नितीचा परिणाम सतत दिसत आहे. गेल्या २० महिन्यात दंतेवाडा जिल्ह्यात १६५ बक्षिस नावावर असलेल्या माओवाद्यांसह ५०८ हून अधिक माओवाद्यांनी हिंसा सोडून समाजाच्या मुख्यधारेत प्रवेश केला आहे. माओवादी संघटनाच्या वरिष्ठ नेत्यांपासून खालच्या स्तरातील सक्रीय कॅडर मोठ्या संख्येने संघटनेपासून दूर गेले आहेत.

‘पुना मारगम: पुनर्वसन ते पुनरुज्जीवन’

‘पुना मारगम: पुनर्वसन ते पुनरुज्जीवन’ ही बस्तरला शांतता, प्रतिष्ठा आणि समग्र विकासाकडे नेण्यासाठी एक परिवर्तनकारी मोहिम म्हणून पुढे जात असल्याचे बस्तर रेंजचे आयजी सुंदरराज पट्टिलिंगम यांनी म्हटले आहे. जे माओवादी आताही जंगलात सक्रीय आहेत त्यांनी देखील हिंसेचा मार्ग सोडून समाज आणि राष्ट्राच्या जबाबदारींना ओळखून मुख्य प्रवाहात सामील होऊन नवे जीवन सुरु करावे असेही त्यांनी म्हटले आहे.