पुतिनसोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा, टॅरिफबाबत घेणार मोठा निर्णय, पहिली प्रतिक्रिया समोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये तीन तास बैठक झाली. या बैठकीनंतर आता भारत आणि चीनसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुतिनसोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा, टॅरिफबाबत घेणार मोठा निर्णय, पहिली प्रतिक्रिया समोर
| Updated on: Aug 16, 2025 | 5:51 PM

अमेरिकेच्या अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये तीन तास बैठक झाली. रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये ठोस असं काही समोर आलं नाही, मात्र भारताचं लक्ष या बैठकीकडे लागलं होतं. या बैठकीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रशियाकडून जे देश तेलाची खरेदी करतात त्यांच्यावरील अतिरिक्त 25 टक्के सेकेंडरी टॅरफी आम्ही हटवू शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

ट्रम्प यांनी जर भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला तर तो भारतासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ट्रम्प यांनी आधी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून त्यांनी अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी भारताला 27 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे, मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे आता अमेरिका आपला हा निर्णय मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीनंतर फॉक्स न्यूजला मुलाखत दिली, यावेळी बोलताना ते म्हणाले की मी अतिरिक्त टॅरिफबद्दल येत्या एक ते दोन आठवड्यात निर्णय घेऊ शकतो. मात्र भारताबाबत बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे. मी सेकंडरी टॅरिफ मागे घेऊ शकतो, मात्र भारतानं रशियाकडून तेल खरेदी न करण्याच मान्य केलं आहे, त्यामुळे रशियाच्या हातून एका मोठा तेलाचा खरेदीदार निसटला आहे असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की चीन रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो त्यामुळे या प्रकारचा टॅरिफ लावला तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात, त्यामुळे टॅरिफ मागे घेण्याचा विचार करू शकतो.

एकीकडे ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली आहे. मात्र दुसरीकडे भारतानं ट्रम्प यांच्या या टॅरिफ नितीला न जुमानता रशियाकड़ून तेलाची खरेदी सुरूच ठेवलेली आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय सरकारी तेल रिफायनरी कंपन्या दररोज तब्बल 20 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी रशियाकडून करत आहेत. मग ट्रम्प यांचा असा दावा करण्या मागचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.