अकबरुद्दीन ओवेसी बनले विधासभेचे प्रोटेम स्पीकर, भाजप आमदारांचा शपथ घेण्यास नकार

MIM चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांना प्रोटेम स्पीकर केल्याने तेलंगणामध्ये आता नवा वाद सुरु झाला आहे. भाजपने याचा निषेध केला आहे. ओवेसी यांच्यासमोर शपथ घेण्यास भाजप आमदारांनी नकार दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील आरोप केले. त्यामुळे तेलंगणामध्ये नवा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.

अकबरुद्दीन ओवेसी बनले विधासभेचे प्रोटेम स्पीकर, भाजप आमदारांचा शपथ घेण्यास नकार
owaisi
| Updated on: Dec 09, 2023 | 3:34 PM

हैदराबाद : AIMIM चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राजभवनात तेलंगणा विधानसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी राजभवनात त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष पोचाराम श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. राज्यपालांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम १७८ अन्वये नवीन स्पीकर निवडून येऊ पर्यंत ओवेसी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील.

एआयएमआयएमचे आमदार हे विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते हैदराबादच्या चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून आले. एआयएमआयएमच्या आमदाराची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती होण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये मुमताज अहमद खान यांना प्रोटेम स्पीकर बनवण्यात आले होते.

टी राजा यांनी केला निषेध

नवनिर्वाचित भाजप आमदार राजा सिंह यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केल्याचा निषेध केला आणि सांगितले की ते आणि इतर पक्षाचे आमदार शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

भाजप आमदार राजा सिंह यांनी व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, मी जिवंत असेपर्यंत एआयएमआयएमसमोर कधीही शपथ घेणार नाही.

राजा सिंह यांनी म्हणाले की, ज्या व्यक्तीने यापूर्वी हिंदूविरोधी वक्तव्य केले होते, त्यांच्यासमोर मी शपथ घेऊ शकतो का? राजा सिंह म्हणाले की मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यापूर्वी बीआरएस, एआयएमआयएम आणि भाजप यांच्यातील संबंध असल्याचा आरोप केला होता आणि आता त्यांनी आपला पक्ष आणि एआयएमआयएममधील संबंध काय आहे हे स्पष्ट केले पाहिजे.