Antilia explosive case: सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा याच्या सह १० जणांवर आरोपनिश्चित, आता खटला चालणार
मुंबईतील अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या (यूएपीए) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आता या प्रकरणाची रितसर सुनावणी सुरू होणार आहे...

मुंबईत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गाजलेल्या एंटीलिया स्फोटक आणि व्यापारी हिरेन हत्याकांड प्रकरणात शनिवारी मोठा कायदेशीर घडामोड घडली आहे. या खटल्यात अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA)माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि अन्य आठ आरोपींच्या विरोधात आरोपनिश्चित केले आहेत.कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सर्व आरोपींच्या विरोधात नियमित खटल्याला सुरुवात होणार आहे.
विशेष (NIA) कोर्टाने न्यायाधीश चकोर बावीस्कर यांनी सर्व आरोपींच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) खूनाच्या कलमासह अन्य गंभीर कलमांसह गैरकायदेशीर कारवाया प्रतिबंध अधिनियम (UAPA)अंतर्गतही आरोप निश्चित केले आहेत. कोर्टात आरोप वाचवून दाखवल्यानंतर सर्व आरोपींनी स्वत:ला निर्दोष सांगितले आणि आरोपांची इन्कार केला. आता कोर्टात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या पुराव्यांआधारे या प्रकरणाची पुढील सुनावणी सुरु होणार आहे.
२५ फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या द.मुंबईतील निवासस्थान एंटीलियाच्या समोर एक बेवारस स्कॉर्पिओ सापडली होती. त्या कारमध्ये स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
ज्या स्कॉर्पिओत स्फोटके होती तिचा मालक मनसुख हिरेन याने होता,त्याने आपली गाडी चोरीला गेल्याचा आरोप केला होता. मात्र, या खुलाशानंतर ५ मार्च २०२१ रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले. त्यानंतर एनआयएने स्फोटके आणि मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास सुरु केला.
एनआयएच्या आरोपानुसार माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार होता. एंटीलियाच्या बाहेर स्फोटकाची कार पार्क करण्यात वाझे याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले. देशातील प्रतिष्ठीत उद्योजकांमध्ये भीती निर्माण करुन त्यांच्याकडून खंडणी वसुल करण्याचा हा कट होता. राजकीय नेतृत्वाकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य पोलिसांना दिले होते.त्यासाठी ही योजना आखली होती.
एनआयएने तपासात दावा केला की सचिन वाझे याला त्याची सुपरकॉपवाली प्रतिमा निर्माण करायची होती. त्यामुळे त्याने हा कट रचला होता. मात्र, व्यापारी मनसुख हिरेन स्फोटकांची जबाबदारी घेण्यास तयार न झाल्याने तो फूटु नये म्हणून त्याचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपाने अनेक आरोप केल्याने हे प्रकरण गाजले होते.