आधी मैत्री केली, विश्वास जिंकला अन्… भारताच्या सैन्य अधिकाऱ्याच्या पत्नीवरच सापळा, धक्कादायक प्रकरणानं खळबळ
जम्मूमध्ये एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात संवेदनशील माहिती परदेशी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित व्यक्तींना दिल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घेऊयात...

जम्मूमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने परदेशी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशिल माहिती पुरवल्याचा आरोप आहे. ही महिला मूळची तेलंगणामधील असून सध्या जम्मूमधील गांधीनगरमध्ये राहते. शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक असल्याचे भासवून चीनी हेरांनी महिलेशी संपर्क साधल्याचा अंदाज आहे. सुरुवातीला त्यांनी तिच्याशी मैत्री करत संपर्क साधून तिचा विश्वास जिंकला. नंतर पर्यावरण आणि भू-राजकारणासारख्या विषयांवर लेख लिहून घेतला. त्यानंतर अभ्यासाच्या गोष्टी केल्या आणि नंतर त्यांनी संरक्षणाशी संबंधित विषयांकडे संभाषण वळवण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
दरम्यान, संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शासकीय गुप्तता कायदा, १९२३ च्या कलम ३ आणि ५, तसेच भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५२ आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय गुप्तता कायद्याचे कलम ३ हे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या माहितीचे संकलन आणि संप्रेषणाशी संबंधित आहे, तर कलम ५ हे संरक्षित माहितीचा गैरवापर आणि चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्याशी संबंधित आहे.
त्या महिलेकडे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती, कागदपत्रे, छायाचित्रे आणि इलेक्ट्रॉनिक डेटा असल्याचा संशय आहे. अशी माहिती एनक्रिप्टेड कम्युनिकेशन चॅनेलद्वारे परदेशातील व्यक्तींना पाठवली जात होती, ज्यांचा संबंध परदेशी गुप्तचर यंत्रणांशी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, संबंधित महिला एका प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकली असावी. ज्या लोकांना ती शैक्षणिक किंवा संशोधक व्यावसायिक समजत होती, ते प्रत्यक्षात संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणारे गुप्तचर होते. याची तिला कल्पना नसावी असा संशय तपास यंत्रणांना आहे. तथापि, या सर्व प्रकरणात आतापर्यंत संवेदनशिल कागदपत्रे किंवा इतर कोणती माहिती दिली गेली आणि तिचे सुरक्षेच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.
पोलिसांनी सामग्री जप्त केली आहे. पण यासंबंघी कोणताही तपशील सार्वजनिकरित्या जाहीर केलेला नाही. तपास यंत्रणा आता प्राथमिकतेने हे निश्चित करण्याचा प्रयत्नानात आहेत की, महिलेची संबंधित हस्तकांशी ओळख कशी झाली, त्यांचं बोलणं कधी सुरू झालं आणि माहितीची कथित देवाणघेवाण किती प्रमाणात झालाी.
हे प्रकरण तपासाच्या प्राथमिक टप्प्यात असून, अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये अद्याप समोर यायची आहेत. तपास यंत्रणांकडून सध्या चौकशी सुरु आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
