
शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा मृत्यू झाला होता. आज त्याचे पार्थिव दफण करण्यात आले. पण या दरम्यान त्याचा भाऊ अफजल अन्सारी आणि गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकारी आर्यका अखौरी यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच IAS आर्यका अखौरी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
IAS आर्यका अखौरी या 2022 मध्ये गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकारी झाल्या. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आर्यका यांची भदोही येथून बदली करून त्यांना गाझीपूरचे जिल्हा दंडाधिकारी पद देण्यात आले होते. जिल्हा दंडाधिकारी म्हणून आयएएस आर्यका अखौरी यांचा हा दुसरा जिल्हा आहे.
डीएम आर्यका अखौरी यांनी पहिल्यांदाच गुंडाशी पंगा घेतला असे नाही. याआधी ही भदोहीमध्ये त्यांनी गुंड आणि शस्त्रास्त्रांविरोधातील कारवाई केली होती. ज्यामुळे त्या चर्चेत होत्या. भदोही जिल्ह्यातील माजी आमदार विजय मिश्रा यांच्यावर गुंडगिरीचे आरोप लावणे आणि त्यांच्या अनेक शस्त्रांचे परवाने रद्द करणे यासह कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली होती.
आयएएस आर्यका अखौरी यांनी सरकारी कार्यालयात लोकांना जीन्स आणि टॉप घालण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ही त्या चर्चेत आल्या होत्या. आर्यका अखौरी. भदोही जिल्ह्यात त्यांच्या पोस्टिंगदरम्यान, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये टी-शर्ट आणि जीन्स पँटवर बंदी घालण्यासह कठोर कारवाईचा इशारा देऊन चर्चेत राहिल्या होत्या.
आर्यका अखौरी या मूळच्या बिहारच्या राहणाऱ्या आहेत. 2013 च्या बॅचच्या त्या IAS अधिकारी आहेत. आर्याका यांनी त्यांचे उच्च शिक्षण नवी दिल्लीत पूर्ण केले आहे. याआधी त्यांनी वाराणसी आणि मेरठमध्ये जॉइंट मॅजिस्ट्रेट तसेच सीडीओ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आयएएस आर्यका अखौरी यांची गणना यूपीच्या कडक आयएएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. आता अफजल अन्सारीसोबत झालेल्या वादानंतर त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.