600 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी आणि 7 लाखाची रोकड फुर्र, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या घरातच जबरी चोरी

पाटणा येथे बिहारच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या घरात मोठी चोरी झाली आहे. चोरांनी 600 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी आणि 7 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वाडच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.

600 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी आणि 7 लाखाची रोकड फुर्र, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या घरातच जबरी चोरी
Sanjay Tiger house robbery
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 11:59 PM

पटणातील सराईत चोरांनी थेट बिहार सरकारच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनाच इंगा दाखवला आहे. उच्च शिक्षण मंत्री संजय टायगर यांच्या घरीच चोरांनी हात मारला आहे. एजी कॉलनीत उच्च शिक्षण मंत्र्याचं घर आहे. 14 आणि 15 नोव्हेंबरच्या रात्री चोरांनी ही चोरी केली. चोरांनी घरातील 600 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी आणि 7 लाख रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेनंतर शास्त्री नगर पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

थेट शिक्षण मंत्र्यांच्याच घरी चोरांनी डल्ला मारल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. उच्च शिक्षण मंत्री संजय टायगर यांचं खासगी घर शास्त्री नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एजी कॉलनीत आहे. याच ठिकाणी मोठी चोरी झाली आहे. घरातून किंमती दागिणे आणि रोख रक्कम चोरी झाली आहे. या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर सवाल केले जात आहेत. तर थेट मंत्र्याच्याच घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

Loading...

प्रत्येक अँगलने तपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय टायगर यांच्या घरातून सुमारे 600 ग्रॅम सोनं, 2 किलो चांदी आणि 7 लाख रुपये रोख रक्कम चोरांनी पळविले आहेत. चोरांनी घरातील किमती सामानच लक्ष्य केलं आहे. रात्रीच्यावेळी ही चोरी करून चोर फरार झाले आहेत. चोरीच्या सामानाची किमत खूप अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या चोरीचा तपास करत असून प्रत्येक अँगलने या घटनेचा तपास करत आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम

विशेष म्हणजे चोरीच्या रात्री पोलिसांची एक टीम या परिसरात गस्त घालून गेली होती. पण त्यांना या परिसरात काही तरी संदिग्ध घडतंय असं जाणवलं नाही. पोलिसांची गस्त असतानाही चोरांनी फूल प्लानिंगने चोरी केल्याने पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या घटनेनंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वायडला बोलावून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आसपासच्या परिसरातील लोकांच्या साक्षी घेत आहे. सीसीटीव्हीही खंगाळले जात आहेत. या चोरीत कोण कोण सामील झाले होते आणि चोर कोणत्या रस्त्याने आले आणि कोणत्या रस्त्याने फरार झाले, याचा पोलीस शोध घेत आहेत. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिसांची एक विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. ही टीम शास्त्रीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांशी मिळून चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us