भाजप नेत्याचा भीषण अपघात, कार एक्स्प्रेस वे वर पलटी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्..
मोठी बातमी समोर येत आहे, भाजप नेत्याच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. कार पलटी झाली. या दुर्घटनेमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

आगरा-लखनऊ एक्स्प्रेस वे वर भाजप नेत्याच्या फॉर्चूनर कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. तालग्राम परिसरात असलेल्या एक्स्प्रेस वे वर हा अपघात घडला. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं. पाण्यामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार एक्स्प्रेस वे वर पलटी झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या कारमध्ये भाजप नेत्या आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष उषा सिंह या प्रवास करत होत्या, त्या लखनऊवरून नोएडाकडे निघाल्या होत्या. या कारमध्ये उषा सिंह यांच्यासह अन्य पाच जण प्रवास करत होते. ही कार तालग्राम परिसरात आली असता आगरा-लखनऊ एक्स्प्रेस वे वर पावसाच्या पाण्यामुळे अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वाहन पलटी झालं. या घटनेत पाचही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या फॉर्चूनर कारमधून भाजपच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष उषा सिंह, आयुष वर्मा, कॉस्टेंबल अरविंद कुमार, विकास यादव आणि गितांजली सिंह असे पाच जण प्रवास करत होते. चालक विकास यादव यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि ही कार डिव्हायडरला धडकून दुसऱ्या लेनवर पलटी झाली. या अपघातानंतर पाचही जण कारमध्ये अडकले, परंतु सुदैवाने त्याचवेळी याच एक्स्प्रेस वे वरून जाणाऱ्या पोलीस कर्मचारी अमित तेवतिया आणि त्यांची पत्नी अर्चना सिंह यांना ही घटना लक्षात आली.
आपघात झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनाच्या खिडक्या तोडून कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातामध्ये पाचही जण जखमी झाले होते. दरम्यान त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच या अपघातामध्ये कारच देखील मोठं नुकसान झालं आहे. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
