
नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आज राजधानी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक होती. या बैठकीत आगामी तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका आणि देशातील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाली. तसेच इंडिया आघाडीची पहिली भव्य सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे घेण्याचं निश्चित झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
विरोधी पक्षांच्या गोटात आगामी निवडणुकांसाठी एवढी सुरु असल्याने सत्ताधारी भाजप पक्षही चांगलाच कामाला लागला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातही आता हालचालींना वेग आलाय. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत नुकतीच दोन दिवसांची जी20 परिषद पार पडली. या परिषदेसाठी जगभरातील दिग्गज नेते आले होते. या परिषदेचं भारताकडून करण्यात आलेलं आयोजनांच जगभरात कौतुक होत आहे. ही परिषद यशस्वी संपन्न झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून जल्लोष सुरु आहे.
भाजपकडून दिल्लीत आज मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. G20 परिषदेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्काराचा आणि अभिनंदनाचा कार्यक्रम भाजपच्या दिल्लीतील कार्यक्रमात आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात दाखल झाले आहे. या कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केलीय. या कार्यक्रमानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीसाठी भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत.
या बैठकीत आगामी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये नेमकी काय रणनीती आखावी याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.