साडे 3 किलो सोनं, 2 किलो चांदी आणि 1 कोटी कॅश… IRS अधिकाऱ्याच्या घरात निघाला कुबेराचा खजिना; कुठे घडलं?

सीबीआयने आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक यांना 45 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक केली आहे. सिंगल यांनी तक्रारदाराकडून आयकर विभागातून दिलासा देण्याच्या बदल्यात लाच मागितली होती. सीबीआयने मोहाली येथे 25 लाख रुपये लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले.

साडे 3 किलो सोनं, 2 किलो चांदी आणि 1 कोटी कॅश... IRS अधिकाऱ्याच्या घरात निघाला कुबेराचा खजिना; कुठे घडलं?
IRS अधिकाऱ्याच्या घरात निघाला कुबेराचा खजिना
Image Credit source: social media
| Updated on: Jun 03, 2025 | 2:48 PM

सीबीआयने शनिवारी एक मोठी छापेमारी केली आहे. 2007च्या बॅचचा एक सीनिअर IRS अधिकारी अमित कुमार सिंगल आणि हर्ष कोटक नावाच्या व्यक्तीला लाच घेताना सीबीआयने अटक केली आहे. IRS अधिकारी अमित कुमारने तक्रारदाराकडे 45 लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. या लाचेच्या बदल्यात आयकर विभागातून दिलासा देण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. मात्र, लाच न दिल्याने अमित कुमारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई, मोठा दंड आणि त्रास देण्याची धमकी दिली होती.

सीबीआयकडे शनिवारी हे प्रकरण आलं. सीबीआयने गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर मोहाली येथे अमित कुमार आणि हर्ष कोटक या दोघांना 25 लाखाची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं. 45 लाख रुपये हे लोक वसूल करणार होते. त्यातील पहिला हप्ता म्हणून त्यांनी 25 लाखाची लाच स्विकारली. सीबीआयने या अधिकाऱ्याला दिल्लीतील वसंत कुंज येथील त्याच्या निवासस्थानातून अटक केली.

छापेमारीत खजिना

सीबीआयने याच केसशी संबंधित दिल्ली, पंजाब आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यात सीबीआयला 3.5 किलो सोनं, 2 किलो चांदी, 1 कोटीची रोख रक्कम, 25 बँक अकाउंट्सचे दस्ताऐवज, एका लॉकरची डिटेल आणि दिल्ली, मुंबई, पंजाबमधील प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे सापडली. सध्या सीबीआय या संपत्तीची व्हॅल्यू आणि सोर्सची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.

14 दिवसांची रिमांड

सीबीआयने या दोन्ही आरोपींना रविवारीच कोर्टात हजर केलं. कोर्टाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सीबीआय या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. हा पैसा आला कुठून? हा पैसाही लाचेचाच आहे का? उत्पन्न आणि मिळकत यातील तफावत किती? आदी गोष्टींचा सीबीआय उलगडा करत आहे. या प्रकरणात येत्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटक करण्यात आलेला आयआरएस अधिकारी अमित कुमार सिंगल सध्या दिल्लीच्या आयटीओच्या सीआर बिल्डिंगमध्ये डायरेक्टोरेट ऑफ टॅक्सपेअर सर्विहिसेजमध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल पदावर कार्यरत होता.