काँग्रेस पाकिस्तानच्या लाइनवर चालतोय; केंद्रीय मंत्री रेड्डी यांचा जोरदार हल्लाबोल

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांवर आणि पाकिस्तानच्या भूमिकेला समर्थन देण्यासारख्या कृत्यांवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

काँग्रेस पाकिस्तानच्या लाइनवर चालतोय; केंद्रीय मंत्री रेड्डी यांचा जोरदार हल्लाबोल
kishan reddy
| Updated on: Apr 29, 2025 | 7:55 PM

पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी घटनेनंतर संपूर्ण भारत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा निषेध केला जात असताना, काँग्रेस पक्षाने, विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली समाजमाध्यमांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून त्यांचा अपमान केला आहे. हे अत्यंत लाजिरवाणं कृत्य आहे. देशासाठी ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.

देशामध्ये शेजारील राष्ट्रासोबत तणाव वाढत असताना, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सरकारसोबत एकोप्याची भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांची भाषा बोलणे सुरू केले आहे. हे पूर्णपणे बेजबाबदारपणाचे लक्षण असून पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या विचारांमध्ये साम्यच दिसून येत असल्याचा हल्लाबोल जी. किशन रेड्डी यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

हे अत्यंत गंभीर

पाकिस्तान काँग्रेस नेत्यांचे ट्वीट्स रीट्वीट करत आहे, यावरून हे प्रकरण किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. पहलगाम घटनेनंतर देशभरातील नागरिक पाकिस्तानवर संतप्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाम भूमिका घेत पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देण्याचा संदेश दिला आहे. तरीही काँग्रेसने पंतप्रधान, सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे न राहता, दहशतवाद्यांचीच भाषा बोलली आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

काँग्रेस पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करतंय का?

पंतप्रधानांच्या छायाचित्रावर “गायब” असा मजकूर लिहून काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांनी जणू काही शत्रू देशाची भूमिका स्वीकारली आहे. अलीकडेच, दहशतवाद्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीचा अवमान करत त्यावर स्वतःचा झेंडा फडकवला होता. आता काँग्रेसनेही पंतप्रधानांबाबत अशीच वागणूक दाखवत आपल्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, काँग्रेस पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करते आहे का, की पाकिस्तान काँग्रेसच्या?, असा संतप्त सवाल रेड्डी यांनी केला.

एका बाजूला राहुल गांधी संयुक्त संसद अधिवेशनाची मागणी करतात, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांचा अवमान करतात. ही विरोधाभासी वागणूक त्यांची दिशाहीनता दर्शवते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. सिद्धरामय्या यांनी नुकतेच “आम्ही पाकिस्तानसोबत युद्धाच्या विरोधात आहोत” असे विधान केले. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर व इतरांनीही अशाच स्वरूपाची भारतविरोधी वक्तव्ये केली आहेत. कालच केरळ कॉंग्रेसने ट्विट केले की, “पहलगाम हे सीमारेषेपासून २०० किमी अंतरावर आहे, त्यामुळे तिथे दहशतवादी पोहोचण्याचा संभव नाही.” हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असून, ते पाकिस्तानला समर्थन देण्यासारखे आहे आणि भारतीय लष्कराच्या मनोबलावर घाला घालणारे आहे.

हे राष्ट्रविरोधीच

राहुल गांधी सातत्याने परदेशात जाऊन भारताच्या घटनात्मक संस्थांविरोधात बोलतात, हेही राष्ट्रविरोधी वृत्तीचेच द्योतक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेल्या अंधविरोधातून काँग्रेस पक्ष वारंवार राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर घाला घालतो आहे. पण मोदी यांची राष्ट्र आणि सुरक्षेबाबतची कटिबद्धता अढळ आहे, असंही त्यांनी सांगितलं.

25 वर्ष सुट्टी घेतली नाही

राहुल गांधी परदेशी दौर्‍यासाठी अनेक दिवस गायब राहतात, तर पंतप्रधान मोदी यांनी गेली 25 वर्षे सुट्टी न घेता देशसेवा केली आहे, सण साजरे करताना त्यांनी सैनिकांबरोबर, स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर वेळ घालवला आहे. दहशतवादी हल्ल्याची बातमी मिळताच पंतप्रधानांनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पहलगामला पाठवले आणि स्वतःही आपला परदेश दौरा थांबवून भारतात परतले. त्यांच्या या कृतीमधून त्यांची देशप्रेमाची भावना स्पष्टपणे दिसून येते, असंही त्यांनी सांगितलं.

देश एकत्र येऊन दहशतवादाविरोधात उभा आहे, आणि अशावेळी काँग्रेसने जी भूमिका घेतली आहे, ती पाकिस्तानसारखीच आहे. मी पुन्हा एकदा काँग्रेसच्या वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना आवाहन करतो की त्यांनी जबाबदारीने आणि राष्ट्रहिताची जाणीव ठेवून वागावे, असंही ते म्हणाले.