Khoka run : विधानसभा तिकीटासाठी 40000000 रुपयांची बोली? काँग्रेसवर गंभीर आरोप, थेट गेमिंगमधून वार
आगामी विधानसभा तिकीटासाठी 40000000 रुपयांची बोली लावल्याचा आरोप काँग्रेसवर करण्यात येत आहे. आता काँग्रसच्या विरोधात गेमिंगद्वारे निशाणा साधला जात आहे.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही आठवड्यांपूर्वी नुवे मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवारीसाठी चार कोटी रुपयांची बोली लावल्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे हॉटेलचे लाखोंचे बील एक नुवेच्या संभाव्य उमेदवाराने फेडल्याचा आरोप राजकीय विश्लेषक अॅड. राधाराव ग्रायियस यांनी केला होता. त्यांनी माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या सोशल मीडया पोस्टच्या आधार घेऊन निशाणा साधला होता. त्यानंतर आता आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने ‘गोय राखन यात्रेचं’ आयोजन केलं आहे. यावरून ‘खोका रन’ नावाचा डिजिटल गेम ऑनलाइन लाँच करत उपरोधिक टोला लगावला आहे.
विनोद आणि इंटरअॅक्टिव्ह गेमप्लेच्या माध्यमातून गोवा काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसवर केलेल्या उपरोधिक डिजिटल टोल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. लाँच करण्यात आलेले गेम हा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या व्यंगचित्रात्मक प्रतिमेवर आधारित आहे. गोव्यात संभाव्य उमेदवारांना पक्षाचं तिकीट विकल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आगामी गोवा विधानसभा निवडणुकीआधी राजकारण पेटलं आहे. श्रीमंतांना तिकीट देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीटाच्या शर्यतीतून वगळल्याचा आरोप केला जात आहे. खेळाडूंना मर्यादित वेळेत जास्तीत जास्त तिकीटे गोळा करण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू लाईव्ह लीडरबोर्डवर अव्वल स्थान मिळवतो, असा हा गेम आहे. या गेममध्ये बक्षिसाची देखील तरतूद आहे. हा खोका रन वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच या गेममध्ये 4 Khokhe, Ticket OK या वाक्याला स्थान देण्यात आलं आहे. या आगळव्या वेगळ्या टीकेने राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काँग्रेसवर नेमका आरोप काय?
राजकीय विश्लेषक ॲड. राधाराव ग्रासियस यांनी मडगावमध्ये पत्रकार परिषदेत आरोप केला. ग्रासियस म्हणाले होते की, ‘काँग्रेसनं पाटो-पणजीत पक्षासाठी काही वर्षांपूर्वी कार्यालय बुक केले होते. त्यासाठी डिपॉझिट रक्कम दिली होती. ते कार्यालय बांधून पूर्ण झालंय. संबंधित बिल्डरने काँग्रेसकडे संपर्क साधला, त्यानंतर पैसे फेडून कार्यालयाचा ताबा घेण्याची मागणी केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. काँग्रेसच्या गोवा प्रदेश समितीला बिल्डरला 12 कोटी रुपये द्यायचे आहे. ही रक्कम बैठकीत वाटाघाटी करून आठ कोटींवर आणण्यात आली आहे. परंतु काँग्रेसकडे बिल्डरला द्यायला रक्कम नसल्याने तिकीट विक्रीला काढल्याचा आरोप आहे. यानुसार नुवे आणि वेळ्ळी या मतदारसंघासाठी कोण चार कोटी देईल, त्यालाच उमेदवारी मिळेल, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोप-प्रत्यारोपानंतर आता गेमिंगमधून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. या टीकेला काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
