दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
| Updated on: Sep 13, 2024 | 1:24 PM

Arvind Kejriwal Grants Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. याप्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. त्यानंतर आता १७७ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीत मद्य धोरणात घोटाळा करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयकडून केजरीवाल यांना अटक करण्यात आली. या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा दोन स्वतंत्र याचिकांवर आज सुनावणी पार पडली. न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भूयां यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ५ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान या याचिकेवरील निकाल राखीव ठेवला होता.

१७७ दिवसांपासून केजरीवाल जेलमध्ये

यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल जाहीर केला आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या १७७ दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये आहेत. आता १० लाख रुपयांच्या जात मुचालक्यावर केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांनी एक ट्वीट केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.