CJP आंदोलनात ‘हिंदुत्व मुर्दाबाद’च्या घोषणा? 300 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा काय?
CJP Protest: SIR, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीने मोर्चा उघडला आहे. दिल्लीत त्यांच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. तर अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्याचवेळी आंदोलनातील एक प्रकार समोर आला आहे.

Goa CJP Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि मतदार याद्यांमधील विशेष पुनर्निरीक्षणाविरोधात कॉकरोच जनता पार्टीने रान उठवले आहे. अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मिळाला आहे. तर आशुतोष रांका आणि सौरव दास हे न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान पक्षाच्या अडचणी वाढताना दिसत आहे. गोव्याची राजधानी पणजी येथे 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान काही धार्मिक भावना भडकवणारे आणि आक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी गोवाा पोलिसांनी आतापर्यंत 300 हून अधिक अज्ञात आंदोलक आणि सीजेपी समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंदुत्व मुर्दाबादच्या घोषणा?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. पणजीत एक सार्वजनिक आंदोलन झाले. स्थानिक प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद, हिंदुत्व मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या, असा आरोप करण्यात येत आहे. तर आंदोलन बदनाम करण्यासाठीच काही घुसखोर आंदोलनात घुसल्याचा सीजेपीने दावा केला आहे.
सोशल मीडियावर या आंदोलनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रामप्रसाद केळकर यांनी या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पणजी पोलीस ठाण्यात या आंदोलकांविरोधात एक तक्रार दिली आहे. त्यानुसार, जाणीवपूर्वक धार्मिक असंतोष पसरवण्यासाठी आणि हिंदूच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचवण्यासाठी अशी घोषणा बाजी करण्यात आली.
पोलीस म्हणाले काय?
पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी या प्रकारवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘पणजी येथे आयोजित एका सार्वजनिक विरोध प्रदर्शनात सीजेपी पदाधिकारी आणि समर्थकांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद, हिंदुत्व मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मुद्दाम हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तक्रारीची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 196 आणि कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओ आधारे संबंधित आंदोलकांची ओळख पटवण्यात येत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था, सांप्रदायिक सद्भाव बिघडवणाऱ्या कोणत्याही कृत्याला थारा देणार नाही. याप्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित दोषींवर कायद्यानुसार, कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणात दिला आहे.