तुमच्या घरात साप आहे की नाही कसं ओळखाल? सर्पमित्रांनी सांगितली सोपी ट्रिक
अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांत तसेच उन्हाळ्यामध्ये साप सुरक्षित जागेच्या शोधात घरात देखील घुसतात. साप घरात एखाद्या अडचणीच्या जागी लपून बसतात. अशा स्थितीमध्ये आपल्या घरात साप आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी सर्पमित्रांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तसेच अनेकदा उन्हाळ्यात देखील साप सुरक्षित जागेच्या शोधात तुमच्या घरात शिरू शकतात. तुमच्या घरात जिथे अडचण आहे, अशा जागी साप लपून बसतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात. अशावेळी ते कोरड्या जागेचा शोध घेत असतात. त्यामुळे साप घरात घुसण्याचा धोका सर्वाधिक असतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बीळ गरम झाल्यामुळे सापांना उष्णतेचा त्रास होतो. साप हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे त्याला उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये साप नेहमी थंड जागेचा शोध घेत असतात. आता असा प्रश्न पडतो की समजा तुमच्या घरात साप आहे, हे कसं ओळखायचं?
जर तुम्हाला आजूबाजूला कुठेही सापाची कात दिसली तर वेळीच सावध व्हा, कारण अशा ठिकाणी आसपास साप असण्याची शक्यता सर्वाधिक असते. जर सापाची कात ताजी असेल त्याने नुकतीच कात टाकली असेल तर तेवढ्याच परिसरात तो कुठेतरी लपून बसलेला असू शकतो. जर कात जुनी असेल तरी देखील त्या परिसरात सापाचा वावर असू शकतो, अशावेळी थोडी काळजी घेण्याची गरज असते.
जर समजा तुमच्या घराच्या आसपास किंवा घरात मेलेले किंवा अर्धवट गिळलेले उंदिर आढळून आले तर शंभर टक्के त्या परिसरात साप असू शकतो. कारण उंदीर ही सापांची मुख्य शिकार आहे. मात्र अनेकदा साप उंदीर गिळतात, परंतु त्यानंतर ते पुन्हा त्यांना शरीरातून बाहेर देखील टाकून देतात. जर तुम्हाला तुमच्या आसपास कुठे अशा अवस्थेत उंदीर आढळून आले तर तिथे साप असू शकतो.
अर्धवट खाल्लेले पक्षी – जर तुम्हाला तुमच्या परिसरात कुठे अर्धवट खाल्लेले पक्षी आढळून आले तरी देखील त्या परिसरात साप असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्याच प्रमाणे जर तुम्हाला अचानक कुठे पक्षी आक्रमक झालेले पाहायला मिळाले, किंवा त्यांचा किलकिलाट ऐकायला मिळाला तरी देखील त्या परिसरात साप असू शकतो.
