गोव्यात ५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी एकत्र येणार! आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होणार, जागतिक व्यापारात दबदबा वाढणार
Vibrant Goa Global Business Summit 2026: गोव्यात २९ ऑक्टोबरपासून ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट पार पडणार आहे. २२० स्थानिक उद्योगांना ३०० हून अधिक जागतिक खरेदीदारांशी जोडणार आहे.

गोव्याला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट २०२६’चे आयोजन २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. गोवा विद्यापीठातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, सांताक्रूझ येथे ही परिषद होणार आहे. व्हायब्रंट गोवा फाउंडेशन आणि गोवा सरकारच्या उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत उत्पादन, व्यापार आणि उद्योजकतेला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे. परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा आहेत.
या परिषदेत ५० हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार, २०० हून अधिक प्रदर्शक, २० हून अधिक राजदूत व वाणिज्य दूतावासांचे प्रतिनिधी, २५ हून अधिक सरकारी नेते आणि १० हजारांहून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असेल. उद्घाटन समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव समारोपाच्या सत्रात प्रमुख भाषण देणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. गोव्याचे मूळ रहिवासी असलेले तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी COGGE कॉन्क्लेव्हमधील सहभाग निश्चित केला आहे.
परिषदेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘रिव्हर्स बायर–सेलर मीट’. या उपक्रमांतर्गत गोव्यातील निवडलेल्या २२० सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी जोडण्यात येणार आहे. खरेदीदारांची मागणी, उत्पादनांची उपयुक्तता, निर्यातीची क्षमता आणि ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी या निकषांवर सहभागी उद्योगांची निवड करण्यात आली आहे. खरेदीदारांच्या गरजा आधीच निश्चित करण्यात आल्यामुळे तीन दिवसांत एक हजारांहून अधिक नियोजित व्यावसायिक बैठका होणार आहेत. परिषद संपल्यानंतरही या बैठकांचे परिणाम आणि त्यातून मिळणाऱ्या संधींचा पाठपुरावा व्हायब्रंट गोवा फाउंडेशनकडून केला जाणार आहे. २०३७ पर्यंत निर्यातक्षम उद्योगांची मजबूत फळी उभारण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
“गोव्यातील उत्पादनांना जागतिक पुरवठा साखळीत स्थान मिळवून देणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. खरेदीदारांच्या शोधात स्थानिक उद्योगांनी जगभर फिरण्याऐवजी, त्यांच्या गरजा स्पष्ट असलेले पात्र जागतिक खरेदीदार आम्ही गोव्यात आणत आहोत. या बैठकींचे रूपांतर प्रत्यक्ष ऑर्डर, निर्यात आणि रोजगारनिर्मितीत व्हावे, यासाठी परिषदेनंतरही उद्योगांना मदत केली जाईल,” असे परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा यांनी सांगितले. GIBF या सामंजस्य करारातील भागीदाराच्या सहकार्याने चौथ्या ‘इंडिया–आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात येणार आहे.
आफ्रिकेतील ३० हून अधिक देशांतील प्रतिनिधी आणि भारतीय उद्योग या माध्यमातून व्यावसायिक ते व्यावसायिक (B2B) तसेच व्यावसायिक ते सरकारी (B2G) बैठका घेतील. पायाभूत सुविधा आणि स्मार्ट सिटी, तंत्रज्ञान व डिजिटल उपाय, आरोग्यसेवा व औषधनिर्मिती, शेती व अन्नप्रक्रिया, उत्पादन व अभियांत्रिकी, ऊर्जा व शाश्वतता, पर्यटन व आदरातिथ्य तसेच शिक्षण व कौशल्यविकास या आठ क्षेत्रांवर कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा होणार आहे. आफ्रिकेतील कंपन्या खरेदीच्या गरजा आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव घेऊन सहभागी होणार असल्याचे कॉन्क्लेव्हचे सह-अध्यक्ष अरमान बँकले यांनी सांगितले.
३० ऑक्टोबर रोजी ‘ग्लोबल सेमीकंडक्टर अँड इलेक्ट्रॉनिक्स लीडरशिप राउंडटेबल’ होणार आहे. ‘भारताचा पुढील सेमीकंडक्टर विकास कॉरिडॉर उभारणे’ ही या चर्चेची मध्यवर्ती संकल्पना असेल. ग्लोबल चेंबर हा या सत्राचा भागीदार आहे. उद्योग नेतृत्व, गुंतवणुकीच्या संधी, संशोधन व तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि जागतिक भागीदारी या पाच मुद्द्यांवर चर्चा होईल. तुएम येथील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर, चिंबल आणि पर्वरी येथील आयटी व स्टार्टअप हब, डेटा व संगणकीय पायाभूत सुविधा तसेच गोव्यातील विमानतळ आणि बंदरांमुळे उपलब्ध होणाऱ्या संधींचा आढावा घेतला जाणार आहे.
उत्पादन, औषधनिर्मिती, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, सागरी उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सेंटर्स, सायबर सुरक्षा, शिक्षण आणि कौशल्यविकास अशा क्षेत्रांतील गुंतवणुकीवरही विविध सत्रांत चर्चा होईल. SARC यांच्या नियोजनाखालील पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि AI या विषयांच्या सत्रात NBCC आणि RVNL यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग असेल. गुंतवणूकदारांशी चर्चेतून सामंजस्य करार आणि गुंतवणुकीच्या घोषणाही अपेक्षित आहेत. याशिवाय ‘डिजिटल गोवा प्लेज’ आणि ‘गोवा हॅपिनेस इंडेक्स’ हे उपक्रमही परिषदेत सादर केले जाणार आहेत.
TiE Panjim चा स्टार्टअप कार्यक्रम ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.४० या वेळेत होणार आहे. एंजल गुंतवणूक, पिच डेक तयार करणे, बाजारपेठेत प्रवेशाची रणनीती आणि सुरुवातीच्या टप्प्यातील व्यवसायांचे अनुभव यावर मार्गदर्शन केले जाईल. ‘TiE Open Mic’ या सत्रात स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. ‘स्टुडंट बडी प्रोग्राम’अंतर्गत गोव्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी व खरेदीदारांसोबत जोडण्याचे नियोजन आहे. ‘अमेजिंग गोवा २०२४’मध्ये ४०२ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. तरुणांचे कौशल्य, आकांक्षा आणि करिअरविषयक योजना जाणून घेण्यासाठी ‘यूथ स्किल करिअर सेन्सस’ही राबवला जाणार आहे. यासोबत तरुणाई, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्सविषयी सत्रे होतील.
३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या COGGE कॉन्क्लेव्हमध्ये परदेशात राहणाऱ्या गोमंतकीय समुदायाला गोव्यातील गुंतवणूक, मार्गदर्शन आणि बाजारपेठेच्या संधींशी जोडण्यावर भर असेल. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर या कार्यक्रमाला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. युनायटेड किंगडममधील व्यावसायिक नेते आणि उद्योग संघटनांशीही संपर्क साधण्यात आला आहे. “परदेशात राहणाऱ्या प्रत्येक गोमंतकीयाच्या मनात गोव्याशी जोडलेली एक भावना असते. या नात्याचे रूपांतर गुंतवणूक, मार्गदर्शन आणि व्यावसायिक संधींमध्ये करणे हा आमचा प्रयत्न आहे,” असे COGGE चे अध्यक्ष मिलिंद अनवेकर यांनी सांगितले.
या परिषदेला GIBF, ग्लोबल चेंबर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, Adam Global Group, TiE Panjim, SARC, NBCC, RVNL, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, बिझनेस गोवा, राष्ट्र टीव्ही आणि गोवा सरकारच्या पर्यटन विभागासह विविध संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नेटवर्कमध्ये ९० देशांतील ३२० हून अधिक केंद्रांचा समावेश आहे. परिषदेत गोव्याचा वारसा, अंतर्गत भागातील पर्यटन, वेलनेस पर्यटन तसेच परिषद आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या संधीही सादर केल्या जाणार आहेत.
व्हायब्रंट गोवा फाउंडेशन ही व्यापार, निर्यात, नवकल्पना आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी कार्यरत ना-नफा सार्वजनिक न्यास संस्था आहे. ‘व्हायब्रंट गोवा ग्लोबल एक्स्पो अँड समिट’, ‘अमेजिंग गोवा’, ‘ग्लोबल टेक समिट’ आणि ‘ग्रीन गोवा समिट’ हे तिचे प्रमुख उपक्रम आहेत. संस्थेच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद सुरेश प्रभू यांच्याकडे आहे.
