
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे भारत-बांगलादेश सीमेवर चांगलाच तणाव वाढला आहे. बुधवारी नूरपूरमधल्या चांदनी चौकातून बीएसएफच्या एका जवानाचं बांगलादेशी घुसखोरांनी कथितरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या जवानाचं अपहरण करून ते त्याला बांगलादेश सीमेच्या पलीकडे घेऊन गेले. यामुळे काही तास भारत -बांग्लादेश सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर बीजीबी बॉर्डर गार्ड बांगादेशच्या जवांसोबत झालेल्या चर्चेनंतर या जवानाची सुटका झाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ज्या बीएसएफच्या जवानाचं अपहरण करण्यात आलं, तो कथालिया गावाच्या परिसरात असलेल्या सीमेवर तैनात होता, याचदरम्यान काही बांगालादेशी घुसखोर सीमा ओलंडण्याचा प्रयत्न करत होते, या जवानाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान काही घुसखोरांनी या जवानाला पकडलं आणि सीमेच्या पलिकडे घेऊन गेले.या घटनेबाबत अधिक माहिती देताना बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आमच्या एका जवानाला बांगलादेशी नागरिकांनी पकडलं होतं, ते त्याला घेऊन बांगलादेशात गेले, त्यानंतर आम्ही तातडीनं बीजीबीला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर या जवानाची काही तासांमध्येच सुटका झाली.आता हा जवान आमच्यासोबत असून, त्याला कुठलीही इजा झालेली नाही.
दरम्यान या संदर्भातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे, मात्र या व्हिडीओला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये, या व्हिडीओमध्ये बांगादेश सीमेच्या आत असलेल्या सुदूर परिसरात एक जवानाला केळीच्या झाडाला बांधलेलं दिसून येत आहे. या जवानाला काही तास बांधून ठेवण्यात आल्याचा दावा देखील या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे भारत-बांग्लादेश सीमेवर चांगलाच तणाव निर्माण झाला असून,बीएसएफकडून या व्हिडीओबाबतची सत्यता तपासली जात आहे.
सीमेवर तणाव वाढला
दरम्यान या व्हिडीओमुळे सीमेवर तणाव चांगलाच वाढला आहे, बांगलादेशी घुसखोरांनी या जवानाचं अपहरण केलं, त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यातच आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे. या व्हिडीओची सत्यता आता तपासण्यात येत आहे.