केंद्रात लवकरच मोठा उलटफेर… गडकरींची ट्रान्स्फर, तरुणांना संधी, महाराष्ट्रातून कुणाची वर्णी? नवी अपडेट काय?

केंद्र सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. यात अनेक जुन्या मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. नितीन गडकरींच्या खात्यात बदल होण्याची शक्यता असून, रिक्त १२ मंत्रिपदे भरली जातील. २०२७ विधानसभा आणि २०२९ लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.

केंद्रात लवकरच मोठा उलटफेर... गडकरींची ट्रान्स्फर, तरुणांना संधी, महाराष्ट्रातून कुणाची वर्णी? नवी अपडेट काय?
nitin gadkari
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 2:53 PM

भाजपने संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर आता केंद्र सरकारमध्येही मोठा उलटफेर होणार आहे. सध्या तरी राजधानी दिल्लीत मोदी सरकारच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. या विस्तारात फार मोठा बदल केला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. विस्तारात अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2027ला होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2029मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा उलटफेर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बदलात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्रान्स्फर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

एका वृत्तवाहिनीने या फेरबदलाबद्दलची बातमी दिली आहे. या वृत्तवाहिनीनुसार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन गडकरी यांच्याकडचं खातं काढून त्यांना दुसरं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जुन्या मंत्र्यांना घरी बसवलं जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात 16 ते 17 नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावरून किती मंत्री घरी बसतील याची कल्पना येते, असं जाणकारांनी सांगितलं.

त्यासाठीच चाय पे चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून खासदारांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. काही खासदारांशी चाय पे चर्चा सुरू आहे. यावरून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळेल आणि कुणाला नाही याचा अंदाज येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 2027मध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका आहेत. इतर राज्यातही निवडणुका आहेत. मात्र उत्तर प्रदेश आणि पंजाबची निवडणूक भाजपसाठी सर्वात महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यातील निवडणुका जिंकणं पाहिजे तेवढं सोपं नाहीये. त्यानंतर 2029मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक तर भाजपसाठी सर्वात महत्त्वाची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा विस्तार होणार आहे. त्यामुळेच नव्या लोकांना संधी देण्याचं भाजपमध्ये घटत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

म्हणून इतरांना संधी

दरम्यान, मोदी सरकारच्या टॉप फाइव्ह मंत्रालयांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. या मंत्र्यांचं काम खराब होतं किंवा त्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता म्हणून नाही तर, इतरांना संधी देण्यासाठी हा फेरबदल होणार आहे. तसेच मोदी कॅबिनेटमध्ये जे मंत्री चांगलं काम करत आहेत, त्यांना इतर वेगळं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. त्याही खात्यातील कामे अधिकाधिक व्हावीत म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

12 मंत्रिपदे रिक्त

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त भार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. नव्या विस्तारात जोशींकडून शिक्षण खातं काढून इतर कुणाला दिलं जाण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांकडे तीन तीन चार चार मंत्रिपदे आहेत. अशा मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी करून ते इतरांना दिलं जाण्याचीही शक्यता आहे. कॅबिनेटमधील 14 मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक मंत्रालये आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. मंत्रिमंडळाची संख्या 81 पर्यंत नेता येते. मोदी सरकारमध्ये सध्या 69 मंत्री आहेत. म्हणजे 12 मंत्रिपदे अद्यापही रिक्त आहेत.

जन्माष्टमीच्या आसपास विस्तार

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतो. काहींच्या मते जन्माष्टमीच्या आसपास हा विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या विस्तारात महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांना प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता आहे. खासकरून उत्तर प्रदेश आणि पंजाबला नव्या विस्तारात अधिक प्राधान्य दिलं जाईल, अशी एक चर्चा आहे. मात्र या विस्तारात कोणत्या नेत्याला संधी मिळेल हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us