गुटखा खाऊन बाल्कनीतून थुंकताच 11 केव्ही वायरचा जोरदार करंट, वृद्धाचा तडफडून जागीच मृत्यू
गुटखा खाऊन थुंकण्यासाठी वाकलेल्या व्यक्तीला वीजेचा प्रचंड मोठा धक्का बसला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना समोर आल्यानंतर वीज विभागावर संताप व्यक्त होत आहे.

बाल्कनीमध्ये उभा राहून गुटखा थुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. बाल्कनीजवळून खाली थुंकताना वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने जोरदार विजेचा धक्का बसून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिथून ते थुंकण्याचा प्रयत्न करत होते, तिथेच ११ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या संपर्कात आल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी त्यांचे शरीर गंभीरपणे भाजले आणि त्यांचे निष्प्राण शरीर बाल्कनीमध्येच अडकून राहिले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांकडून वीज विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी कुठे घडली ही घटना?
ही घटना मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात घडली आहे. गंजबसोडा येथील गायत्रीनगर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मूळचे छतरपूर येथील असलेले ६५ वर्षीय प्रभुलाल गुप्ता हे गेल्या १० वर्षांपासून गायत्री नगरमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते.
ही दुर्दैवी घटना घडली, तेव्हा प्रभुलाल हे आपल्या घराच्या तिसऱ्या मजलव्यावरी बाल्कनीमध्ये उभे होते. गुटखा थुंकायला खाली वाकले असता त्यांना बाल्कनीला लागून असलेल्या ११ केव्ही इतका प्रचंड दाबाच्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना गंभीर झटका लागला आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर सगळ्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. लोकांनी गर्दी केली. त्यानंतर काहीजणांनी वीज विभागाला कळवलं आणि मग वीजेचा पुरवठा बंद करण्यात आला. ११२ वर संपर्क साधून नागरिकांनी पोेलिसांना बोलावलं. पोलिस दाखल झाल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करुन बॉडी खाली उतवण्यात आली. बॉडीला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
याप्रकरणानंतर परिसरातील नागरिकांनी उच्च दाबाच्या तारांवर आक्षेप घेतला आहे. घरमालक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. पद्मा चिधर यांच्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी ही तार हटवण्याची वारंवार विनंती केलेली आहे. पण आजपर्यंत ही धोकादायक तार हटवण्यात आली नाही. केवळ आश्वासनं दिली गेली. जर ही तार हटवली गेली असती तर आजही दुर्घटना घडली नसती
