जगाला धाक लागलेली ही गँग आता थेट दहशतवादी संघटना, मोदी सरकारची मोठी घोषणा; पाकिस्तानचं कनेक्शन काय?

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याची गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्वीट करून या संदर्भातील माहिती दिली आहे. ही गँग भारतातील तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कृत्य प्रवृत्त करण्याचं काम करत होती.

जगाला धाक लागलेली ही गँग आता थेट दहशतवादी संघटना, मोदी सरकारची मोठी घोषणा; पाकिस्तानचं कनेक्शन काय?
राज्यातही पसरलं होतं जाळं! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीची गँग अखेर 'दहशतवादी संघटना', मोदी सरकारची मोठी कारवाई
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Sep 16, 2026 | 3:57 PM

केंद्रीय गृह मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारत सरकारने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीची गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 16 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृत अधिसूचना जारी करून ‘शहजाद भट्टी नेटवर्क’वर दहशतवादी संघटना म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर आता या टोळीच्या आर्थिक नाड्या पूर्णपणे आवळल्या गेल्या आहेत. मूळचा पाकिस्तानच्या रहिवासी असलेला शहजाद भट्टी सध्या परदेशातून त्याचे काळे साम्राज्य चालवतो. भारतीय यंत्रणांच्या तपासानुसार, या दहशतवादी टोळीचा वावर थेट 14 राज्यांमध्ये होता. त्यामुळे शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली गेली होती. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी राज्य पोलीस दलांच्या मदतीने हा संयुक्त देशांतर्गत ऑपरेशन राबवण्यात आलं. या कारवाई अंतर्गत शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित 253 हून अधिक संशयितांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी सर्वाधिक व्यक्ती उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथील होत्या. या सर्वांचा भट्टीशी संपर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून आला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यालयाकडून या संदर्भात ट्विट करून माहिती दिली की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या संकल्पनेचा पाठपुरावा करत, गृह मंत्रालयाने ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. ही संघटना फक्त सीमेपलीकडून शस्त्रे, स्फोटके आणि अंमली पदार्थांची तस्करी करत नव्हती, तर भारतातील तरुण आणि छोट्या गुन्हेगारांना भडकावून त्यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करण्याचे काम करत होती. भारताची लोकशाही रचना आणि जातीय सलोख्याचे सामाजिक फॅब्रिक नष्ट करण्याच्या उद्देशाने या सिंडिकेटने सातत्याने द्वेषयुक्त डिजिटल सामग्री देखील प्रकाशित केली होती.” बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, 1967 (UAPA) च्या पहिल्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून ‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला 46 व्या क्रमांकावर अधिकृत दहशतवादी संघटना म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, शहजाद भट्टी नेटवर्कच्या काळ्या कारनाम्यांविरोधात आतापर्यंत 80 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत. हे सर्व गुन्हे UAPA, भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट, एनडीपीएस ॲक्ट आणि विस्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा ब्राझीलमध्ये लपून बसला असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यात पंजाबशी संबंधित दहशतवादी हल्ल्यांचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत हा मोठा खुलासा झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us