
‘जर तुम्ही आम्हाला एक कोटी देऊ इच्छीत आहात तर, मी तुम्हाला दोन कोटी देते, फक्त मला माझे पापा परत करा…,’ या शब्दात फाल्गुनी हिने प्रशासनाला खडसावले आहे. माझ्या वडिलांना परत करा असा टाहो फाल्गुनी हीने केला आहे. फाल्गुनी हिने तिच्या भावना एका खाजगी चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या. फाल्गुनी हीच्या आवाजातील दु:ख , राग, एका मुलीचे पित्याबद्दलचे प्रेम व्यक्त होत आहे.
फाल्गुनी हीने सवाल केला की कोणी सांगावे माझ्या पापाची काय चूक आहे. की त्यांनी हे फ्लाईट पकडले. मी मुलगी
आहे. मला माझे पापा परत करा. एअर इंडियाने काय अवहेलना केलीय, काहीच उत्तर नाही, त्यांना काही संवेदनशीलता आहे की नाही असा सवालच फाल्गुनी हिने केला आहे.
आम्हाला एक कोटी देण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मी तु्म्हाला दोन कोटी देते, परंतू माझ्या पापा मला परत कराल. पैशाने माणूस परत येतो काय ? आम्ही त्या पैशांतून पलंग खरेदी करु, परंतू त्यावर झोप कशी येईल.जे खरे प्रेम मला माझे पापा द्यायचे, ते कुठे मिळेल ? असा आर्त सवाल फाल्गुनी हीने केला आहे.
फाल्गुनी पुढे म्हणते की माझे वडील देशभक्त होते. ते स्वतः एअर इंडियाचा प्रवास अभिमानाने करायचे. ते नेहमी म्हणायचे, एअर इंडियाचा आम्हाला अभिमान वाटतो. तो देशाचा अभिमान आहे. पण, माझ्या वडिलांना त्यांच्या देशभक्तीचे बक्षीस म्हणून काय मिळाले? देशाचे नाव असे चालवायचे आहे का? जर तुम्ही सुरक्षितपणे उड्डाण करू शकत नसाल तर एअर इंडिया बंद करुन टाका. हा काही विनोद नाही. एखाद्याच्या जीवापेक्षा जगात काहीही महत्त्वाचे नसते असा जळजळीत सवाल फाल्गुनी हिने करुन सर्वांनाच अंतर्मुख केले आहे.
एअर इंडियाच्या सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या ड्रीमलायनर या विमानाला काल दुपारी अहमदाबाद येथून टेक ऑफ घेत असताना ते हॉस्टेलवर कोसळल्याने विमानातील 242 प्रवाशांसही हॉस्टेलच्या 12 जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणानंतर आता एअर इंडियाने मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या वारसांना एक कोटीची मदत जाहीर केलेली आहे. या विमानाच्या अपघाताला देशातील सर्वात मोठा विमान अपघात म्हटला जात आहे. या प्रकरणातील मृतांची ओळख पटवण्यासाठी 200 हून अधिक जणांच्या डीएनए टेस्ट घेण्यात येत आहेत.