राज्यपालपदी नियुक्तीची चर्चा, सुषमा स्वराज म्हणतात…

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्तीच्या शुभेच्छा दिल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, काहीवेळातच हे ट्वीट डिलिट करण्यात आले.

राज्यपालपदी नियुक्तीची चर्चा, सुषमा स्वराज म्हणतात...


नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्तीच्या शुभेच्छा दिल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, काही वेळातच हे ट्वीट डिलिट करण्यात आले.

हर्षवर्धन यांच्या ट्वीटमध्ये म्हटले होते, ‘भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आंध्रप्रदेशचे राज्यपाल झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या सर्व क्षेत्रातील मोठ्या अनुभवाचा आंध्रमधील जनतेला नक्कीच फायदा होईल.”

हर्षवर्धन यांचे हेच ट्वीट डिलिट होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर स्वतः सुषमा स्वराज यांनाच स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढावली. त्यांनी ट्वीट करत अशी कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. स्वराज अशा नेत्यांपैकी एक आहेत ज्यांना पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. याचे कारण स्पष्टपणे सांगितले गेलेले नाही. तरिही स्वराज यांच्या आरोग्याच्या प्रश्नामुळे असे झाल्याचे बोलले जाते. स्वराज यांनी देखील याआधीही आरोग्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करु शकणार नसल्याचे म्हटले होते.