देशातील सर्वात श्रीमंत महिलेनेही काँग्रेसची साथ सोडली, वय 84; संपत्ती अब्जावधीची; वाचा सविस्तर

| Updated on: Mar 28, 2024 | 1:05 PM

लोकसभा निवडणुकच्या पहिल्या टप्प्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ही प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पक्षांतरही मोठ्या प्रमाणावर सुरू झालं आहे. कालपरवा पर्यंत काँग्रेस सोबत असलेलं एक उद्योग घराणं आता भाजपशी जोडलं गेलं आहे. नवीन जिंदल यांच्या नंतर त्यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री सावित्री जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हरियाणात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात श्रीमंत महिलेनेही काँग्रेसची साथ सोडली, वय 84; संपत्ती अब्जावधीची; वाचा सविस्तर
देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे
Follow us on

लोकसभा निवडणुकीचं रण प्रचंड तापलं आहे. या धामधुमीत आयाराम गयारामांचीही चलती सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. खासदार आणि आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. सावित्री जिंदल या ओपी जिंदल समूहाच्या चेअरमन आणि हरियाणाच्या माजी मंत्री आहेत. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी काँग्रेस सोडत असल्याची घोषणा केली.

सावित्री जिंदल या उद्योजिका आहेत. माजी मंत्री आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच हरियाणात त्यांचा मोठा दबदबा आहे. सावित्री जिंदल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने हरियाणात काँग्रेसचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सावित्री यांनी ट्विटरवर एक पोस्ट करून पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. आमदार म्हणून गेल्या दहा वर्षापासून मी हिसारचं प्रतिनिधीत्व केलं. एक मंत्री म्हणून निस्वार्थ भावनेने कामही केलं. हिसारची जनता माझं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या सल्ल्यानेच मी पक्ष सोडत आहे, असं सावित्री जिंदल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने मला नेहमी समर्थन दिलं. माझा सन्मान राखला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

संपत्ती किती?

सावित्री जिंदल यांनी पक्ष सोडल्यानंतर आता त्यांची संपत्तीही चर्चेत आली आहे. सावित्री यांचं वय 84 आहे. त्या जिंदल समूहाचा कारभार सांभाळतात. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या नुसार, 28 मार्च 2024 पर्यंत सावित्री जिंदल यांची एकून संपत्ती 29.6 अब्ज डॉलर आहे. म्हणजे एकूण 2.47 लाख कोटीच्या जवळपास आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचं स्थान पहिलं आहे. तर जगातील टॉप अब्जाधिशांच्या यादीत त्यांचा क्रमांक 56 वा येतो.

राजकीय करिअर

ओपी जिंदल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदल या गेल्या दहा वर्षापासून हिसार विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी हरियाणाच्या मंत्री म्हणूनही काम केलं आहे. 2005मध्ये झालेल्या एका दुर्घटनेत त्यांचे पती आणि जिंदल समूहाचे संस्थापक ओपी जिंदल यांचं निधन झालं होतं. त्यानंतर सावित्री जिंदल यांनी विधानसभा निवडणूक लढली असता त्या विजयी झाल्या. त्यानंतर 2009मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. तसेच 2013मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं होतं. परंतु, 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

अनेक देशात व्यवसाय

ओपी जिंदल समूहाचा व्यवसाय अनेक सेक्टरमध्ये विस्तारलेला आहे. स्टील, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, सिमेंट, गुंतवणूक आणि पेंट आदी सेक्टरमध्ये जिंदल समूहाचा व्यवसाय आहे. देशातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांचा व्यवसाय आहे. अमेरिका, यूरोप आणि यूएईपासून चिलीपर्यंत त्यांचा कारभार आहे.

सावित्री जिंदल यांच्या आधी त्यांचे चिरंजीव नवीन जिंदल यांनी आधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपचे उमेदवार म्हणून कुरुक्षेत्र येथून लोकसभा लढणार आहेत. कुरुक्षेत्र येथून नवीन जिंदल 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 दरम्यान खासदार होते.